| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाळ संस्कृती फोफावत आहे. या चाळकऱ्यांकडून आपल्या घरातील कचरा परिसरात अस्ताव्यस्त टाकला जात आहे. त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला असून दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, चाळधारकांच्या घरातील सर्व कचरा रस्त्यावर टाकला जात असून नेरळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत परिसरामध्ये अनेक वसाहती झपाट्याने वाढत आहेत. नेरळमधील मोहाची वाडीजवळ असलेली कोमलवाडी येथे मोठ्या प्रमाणात चाळी उभारण्यात आलेल्या आहेत. या चाळींमध्ये मोठ्या संख्येने लोक राहात असून देखील येथील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीकडून घंटागाडी जात नाही. त्यामुळे चाळधारक घरातील कचरा आनंदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत टाकत आहेत. त्यामुळे तेथे दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या रहिवाशी शाळकरी मुलांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील येथे उपस्थित होत आहे. तसेच, या कचऱ्यामुळे परिसरातील कुत्रे येथे जमा होत असतात. त्यामुळे शाळकरी मुले या रस्त्याने जात असताना त्यांच्या अंगावर तेथील जमा झालेली कुत्री धावून जातात. त्यामुळे त्यांच्यासह पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.







