चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा

उपांत्यपूर्व फेरीच्या लढती निश्चित !

| लंडन | वृत्तसंस्था |

चॅम्पियन्स लीग या युरोप खंडातील मानाच्या फुटबॉल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. या मोसमात साखळी फेरीच्या लढतींत सहाही लढती जिंकणाऱ्या रेयाल माद्रिद-मँचेस्टर सिटी दोन बलाढ्य संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील लढत माद्रिदमध्ये होणार असून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लढत मँचेस्टरमध्ये पार पडणार आहे. रेयाल माद्रिद क्लबने 14 वेळा या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली असून मँचेस्टर सिटी क्लबने गतवर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याची किमया साधली आहे. यामुळे या दोन माजी विजेत्यांमधील लढत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

इतर लढतींवर दृष्टिक्षेप
आर्सेनल-बायर्न म्युनिच, ॲटलेटिको माद्रिद-बोरुसिया डॉर्टमंड व पॅरिस सेंट जर्मेन-बार्सिलोना अशा तीन उपांत्यपूर्व फेरीच्या लढती पार पडणार आहेत. चारही उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा 9/10 एप्रिलला खेळवण्यात येईल. तसेच दुसरा टप्पा 16/17 एप्रिलला रोजी आयोजित करण्यात येईल.
चार बलाढ्य संघ
चॅम्पियन्स लीग संयोजकांकडून स्पर्धेचा ड्रॉ असा पाडण्यात आला आहे की, चार बलाढ्य संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे. आर्सेनल-बायर्न म्युनिच व रेयाला माद्रिद-मँचेस्टर सिटी अशा या लढती असणार आहेत. या दोन लढतींतील विजेते एकमेकांसमोर उपांत्य लढतीत उभे ठाकणार आहेत. त्यामुळे पॅरिस सेंट जर्मेन-बार्सिलोना, ॲटलेटिको माद्रिद-बोरुसिया डॉर्टमंड यांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास तुलनेने सोपा असणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींचे वेळापत्रक
आर्सेनल - बायर्न म्युनिच
ॲटलेटिको माद्रिद - बोरुसिया डॉर्टमंड
रेयाल माद्रिद - मँचेस्टर सिटी
पॅरिस सेंट जर्मेन - बार्सिलोना
Exit mobile version