अजिंक्यपद स्पर्धा भारतीयांमध्येच व्हावी

बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंद यांचे मत

। मुंबई । प्रतिनिधी ।

बुद्धिबळ विश्‍वात पुरुषांमध्ये आपली ताकद आणि क्षमता किती आहे हे बुद्धिबळ ऑलिंपियाडमधून सिद्ध झाले आहे. गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुनसारखे खेळाडू भारताचे भविष्य आहेत. यामुळे विश्‍व अजिंक्यपद स्पर्धा दोन भारतीयांमध्येच झाली तर याच्यासारखे दुसरे भाग्य नसेल, असे मत महान बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंद यांनी व्यक्त केले आहे. पुढील महिन्यात सुरू होणार्‍या ग्लोबल चेस लीगचा कार्यक्रमासाठी विश्‍वनाथन आनंद मुंबईत आले होते.

बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये पुरुष आणि महिला विभागात प्रथमच अजिंक्यपद मिळवल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर आनंद मुंबईत आले होते. यावेळी बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील यश आणि भारताचे बुद्धिबळातील भवितव्य याबाबत आनंद भरभरून बोलले. ते म्हणाले की, येत्या काळात विश्‍वविजेत्या चीनच्या डीन लिरेन याला भारताचा गुकेश आव्हान देणार आहे. या लढतीकडे आता बुद्धिबळ विश्‍वाचे लक्ष लागून राहिले आहे. सध्याची भारताची बुद्धिबळ खेळातील ताकद आणि प्रगती पाहता भविष्यात ही लढत दोन भारतीयांमध्येच व्हावी, असे आनंद गर्वाने म्हणाले. गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुनसारख्या खेळाडूंमुळे बुद्धिबळात भारताची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुढील पाचच काय तर दहा वर्षे तरी भारताचे वर्चस्व राहील, असेदेखील आनंद यांनी सांगितले. तसेच, भारतात बुद्धिबळ खेळाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अधिकाधिक महिलांनी या खेळात प्रगती करावी, असे मत आनंद यांनी व्यक्त केले.

बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारतीय पुरुषांनी एकतर्फी वर्चस्व राखले, यामुळे विजेतेपद निश्‍चित वाटत होते. कारण एखादी लढत गमावली असली तरी दुसरा खेळाडू त्याची भरपाई करण्याच्या ताकदीचा होता. महिलांमध्ये एक लढत गमावली, नंतर बरोबरीत समाधान मानावे लागले. यानंतर मिळवलेले विजेतेपद आनंददायी होते. पुढे अनेक वर्षे बुद्धिबळ विश्‍व गाजवण्याची क्षमता पुरुष संघाकडे असली तरी गाफिल राहून चालणार नाही. कारण माझ्या मते पुढची बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धा अधिक आव्हानात्मक असू शकेल.

– महान बुद्धिबळपटू विश्‍वनाथ आनंद

Exit mobile version