सामनाधिकार्यांकडून दुसर्या दिवसाचा खेळ रद्द
। कानपूर । वृत्तसंस्था ।
भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. हा सामना शुक्रवार दि.27 सप्टेंबरपासून सुरू झाला असून पहिल्या दिवसापासून या सामन्यावर पावसाचे सावट आहे. आता या सामन्यात शनिवारी (दि.28) म्हणजेच सामन्याच्या दुसर्या दिवशी पावसामुळे खेळच होऊ शकलेला नाही. दुपारपर्यंत पाऊस थांबण्याची वाट पाहण्यात आली, मात्र खेळ दुसर्या दिवशी होऊ शकणार नाही असे लक्षात आल्यानंतर सामनाधिकार्यांकडून दुसर्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. यामुळे आता रविवारी सामन्याच्या तिसर्या दिवशी खेळ पुन्हा सुरू होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.
या सामन्यात पहिल्या दिवशी नाणेफेकीलाही पावसामुळे उशीर झाला होता. पण नंतर सामना सुरू झाला. सुरुवातीला बांगलादेशचे सलामीवीर झाकीर हसन आणि शादमन इस्लाम यांनी संयमी सुरुवात केली होती. परंतु, आकाश दीपने झाकिरला शुन्यावर बाद केले, तर शादमन इस्लामला 24 धावांवर बाद केले. पण यानंतरही बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल हुसैन शान्तो आणि मोमिनुल हक यांनी बांगलादेशचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. यांनी दुसर्या सत्रातही चांगली सुरूवात केली होती. पण 29 व्या षटकात आर अश्विनने शान्तोला 31 धावांवर बाद केले. तो बाद झाल्यानंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही. यामुळे पहिला दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशने 35 षटकात 107 धावा केल्या होत्या. मोमिनुल हक 81 चेंडूत 40 धावांवर नाबाद राहिला, तर मुश्फिकुर रहिम 6 धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना भारताने 280 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यामुळे आता भारताला दुसरा सामना जिंकून बांगलादेशला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. तसेच, बांगलादेशला जर मालिका पराभव टाळायचा असेल, तर त्यांना दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे.