| उरण । वार्ताहर ।
सिडकोच्या माध्यमातून उरण चारफाटा येथे रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण करणे सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरण होऊनही तो चारही बाजूला लागणार्या वेड्यावाकड्या गाड्यांमुळे अपघातांचे ठिकाण बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिडकोने चारफाटा येथे रस्ता रुंद करून त्याठिकाणी सर्कलची उभारणी हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री हा परिसर उजाळून निघत आहे. मात्र भर रस्त्यावर वाहनचालक वेडीवाकडी आपली वहाने उभी करून ठेवत असल्याचे चित्र सर्रासपणे पहायला मिळत आहे.यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसते.
रस्त्यावर चौक असल्याने चारही बाजूने वहानांची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते. तसेच भर रस्त्यावर उभ्या रहाणार्या वहानांमध्ये इको, रिक्षा, रिक्षा टेम्पो, टेंम्पो ट्रक व इतर खासगी वहाने उभी केलेली असतात. तसेच मोटारसायकल पार्किंग प्रमाणे उभ्या करून कोणी पार्किंग माफिया वसुली करीत असल्याचे समजते.
सदरचा चौक असल्याने सर्कल बसविण्यात आला आहे. परंतु याठिकाणी चारही बाजूला प्रवाशी वाहतूक करणार्या इको सारख्या गाड्या वळणावरच उभ्या केलेल्या असतात यामुळे समोरून जाणार्या वहान चालकांना दुसर्या साईडवरून येणारी गाडी दिसत नाही. यामुळे एखाद दिवशी या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता वहान चालकांनी वर्तवली असूनही इको कारचालकांना याचे कोणतेच सोयरसुतक नाही. याची कल्पना इको चालकांना देऊनही ते आपल्या मालकीचा रस्ता असल्याप्रमाणे गाड्या उभ्या करीत असतात. यामुळे भविष्यात सदर चौक अपघातग्रस्त चौक म्हणून बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची खबरदारी घेऊन कमीतकमी वळणावरील वहाने तरी हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.