सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड पोलिस ठाणे जवळील साकवाची एक बाजुची भिंत व दुसऱ्या बाजुचे कठडे तुटल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुरुड पोलिस ठाण्याजवळील मुख्य रस्त्यावर काही अंतरावर साकव असून याच साकवाच्या रस्त्यावरून मुंबई, ठाणे, अलिबाग आदीसह भागातून रोजच्या हजारो गाड्या ये-जा करीत असतात. त्यात हा रस्ता कमी अरुंदीचा असल्याने वाहनचालकांना या ठिकाणावरुन गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. एकदा चालक रात्रीच्यावेळी ओव्हरटेक करताना जर चालकाच्या लक्षात आले नाही तर या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. येथील अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी पडलेली भिंत व दुसऱ्या बाजूला तुटलेल्या सिमेंटच्या कठड्यांना ताबडतोब दुरुस्त करुन वाहनचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
रिक्षा चालक सुधीर माळी यांनी सांगितले की, रस्त्यावरील साकवाच्या एका बाजूची भिंत पडली आहे. तर दुसऱ्या बाजूचे कठडे तुटले आहेत. जर एखाद्या भरधाव वाहनचालकाचे लक्ष नसेल आणि ओव्हरटेक करत असेल तर नक्कीच या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. हे माहित असून सुद्धा या ठिकाणी धोक्याची निशाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावणे क्रमप्राप्त असून सुध्दा लावत नाही. हा मोठा प्रश्न स्थानिक सर्व वाहनचालकांना पडला आहे. असे सुधीर माळी यांनी सांगितले.
