पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पुढील 3-4 तासात पावसाची शक्यता

| रायगड | प्रतिनिधी |

मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण परिसरात आजदेखील वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण परिसरात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर येत्या तीन-चार तासांत वातावरण बदलणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी वारे आणि पाऊस बरसताना दिसत आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने कोकण परिसरात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र, दुपारनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या तीन ते चार तासांमध्ये ठाणे, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि रायगडातील काही भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. या भागात जवळपास 40 ते 50 किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहतील. त्याचसोबतच या सर्व परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हवामान खात्याकडून प्रवाशांना खबरदारीचे आवाहन
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मंगळवारी संध्याकाळी पुन्हा पाऊस झाल्यास रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. अगदी थोड्या पावसानेही मध्य रेल्वे ठप्प होते, असा लौकिक आहे. त्यामुळे आजदेखील मुंबईतील चाकरमान्यांना घरी जाताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कालच्या तुलनेत आज वाऱ्याचा वेग कमी राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. परंतु, वाऱ्यांचा वेग हा नेहमीपेक्षा जास्त असेल, तसेच पाऊसही असेल. त्यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
Exit mobile version