तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे कुलगुरुंचे दुर्लक्ष

विद्यापीठ बंद होण्याच्या मार्गावर ; जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकरांचा आरोप


| माणगाव | प्रतिनिधी |

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांना तोंड देत आहे. याकडे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अक्षम्य दुर्लक्ष चालवले असून, हे विद्यापीठ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप शिवसेना द. रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ पटांगणात शासन आपल्या दारी हा शासनाचा उपक्रम दि. 5 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. त्या जागेची पाहणी व नियोजन करण्यासाठी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत हे विद्यापीठात आले होते, त्यावेळी आपण सविस्तर निवेदन देऊन लक्ष वेधणार आहोत, असे श्री. घोसाळकर यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, शासनाच्या आदेशाने दि. 30 मार्च 2023 रोजी इंस्ट्रीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग विद्यापीठात विलीनिकरण झाले आहे. शासन ज्ञापन निर्गमीत होऊन 9 महिने इतका कालावधी होऊन प्रशासकीय तसेच लेखाविषयक एकत्रित कामकाजाबाबत कोणताही ठोस निर्णय कुलगुरु व कुलसचिव घेत नाही. इन्स्टीट्यूटचे नॉन टिचींग जवळ जवळ 20 कर्मचारी कायम आहेत. ते सर्व कर्मचारी 9 महिने काही काम न करता फुकट लाखो रुपयांचा पगार दरमहा घेत असून, विद्यापीठाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे श्री. घोसाळकर यांनी निदर्शनास आणून दिले. कुलसचिव कार्यालयात 4 कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्या ठिकाणी 10 कर्मचारी काम करतात. एवढ्या कर्मचाऱ्यांची गरज नाही. नियमित प्राध्यापकांच्या व काही कर्मचाऱ्यांच्या पत्नी व नातेवाईक यांच्या नेमणुका प्रत्येक वर्षी सातत्याने तात्पुरत्या स्वरुपात स्थानिकांना डावलून होत आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या घरातील दोन-दोन नातेवाईक कामावर घेतलेले आहेत. स्थानिकांना डावलून विद्यापीठाची आर्थिक लूट केली जात आहे, असा आरोपही श्री. घोसाळकर यांनी केला आहे.

अस्तित्वात नसलेली पदे निर्माण करुन मर्जीतल्या लोकांची स्वतःच्या फायद्यासाठी खोगीर भरती केली आहे. नवीन वसतिगृहे दोन वर्षांपासून बांधून सुसज्ज स्थितीत असून, ती बंद आहेत. विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जात नाही. विद्यापीठात कसल्याही प्रकारचे शैक्षणिक कामकाज होत नसून, मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा अत्यंत खालावला आहे. कुलगुरु यांची नेमणूक होऊन दोन वर्षे झाली. त्यावेळीपासून त्यांची प्रत्यक्षात उपस्थिती नगण्य आहे. त्यामुळे विद्यापीठात कोणतेही धोरणात्मक निर्णय होत नाहीत. विद्यापीठात कंपन्यांचे कॅम्प मोठ्या प्रमाणात होत नसल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याकडे कल कमी झालेला आहे, याकडे श्री. घोसाळकर यांनी लक्ष वेधले आहे.

विद्यापीठाच्या दयनीय अवस्थेमुळे स्थानिकांमध्ये फार नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चाळके यांनीदेखील विद्यापीठाची स्थिती सुधारण्याबाबत वारंवार चर्चा केलेली आहे. मात्र, विद्यापीठाकडून दुर्लक्ष केले जात असून, अशाच प्रकारे विद्यापीठाची वाटचाल सुरु राहिल्यास विद्यापीठ एक दिवस बंद पडेल, असा आरोप श्री. घोसाळकर यांनी केला आहे.

प्रशासनाचा हलगर्जीपणा
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. बॅ. अंतुले यांचे सहकार्याने लोणेरेमध्ये विद्यापीठ झाले. विद्यापीठाला शासनाने पाच गावांची मिळून 466 एकर जमीन अत्यंत अल्प मोबदल्यात म्हणजे 10 हजार रुपये एकरी शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा विरोध असून, शैक्षणिक भव्य संकुल होत असल्याने आमच्या सहकार्याने जमिनी संपादित करुन दिल्या. ता. 5 मे 1986 रोजी विद्यापीठ सुरु झाले. आज त्याला 37 वर्षे झाली. सुरुवातीला प्रथम कुलगुरु कै. देशपांडे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सुरुवात केली व विद्यापीठाचा दर्जा उच्च ठेवला होता. महाराष्ट्रात बाटुचा विद्यार्थी म्हणून अनेक कंपन्यांनी गौरविले व विद्यार्थ्यांना चांगली नोकरीची संधी मिळाली. प्रवेशासाठी देशपातळीवर विद्यार्थी यायचे. सद्यःस्थितीत कुलगुरु व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रवेश होत नाहीत, असा आरोप प्रमोद घोसाळकर यांनी केला आहे.

Exit mobile version