मुरूड आगारात सीएनजी पंपाची शक्यता धुसर

स्थानिक नागरिकांसह प्रवाशांत नाराजी

| मुरूड-जंजिरा | प्रतिनिधी |

मुरूड एसटी आगारात सीएनजी गॅस पंप उभारणीचा प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांत नाराजीचे वातावरण आहे. सर्वेक्षण पूर्ण होऊनही अंतिम निर्णय न झाल्याने पंप सुरू होण्याची शक्यता सध्या धुसर झाल्याचे समजते.

मुरूड आगारातून मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या बहुतेक एसटी बस सीएनजीवर चालतात. मात्र, आगारात सीएनजी पंप उपलब्ध नसल्याने बसना अलिबाग किंवा अन्य ठिकाणी गॅस भरण्यासाठी जावे लागते. त्यामुळे किमान अर्धा तास अतिरिक्त थांबा घ्यावा लागतो. परिणामी वेळापत्रक बिघडते, प्रवाशांचा खोळंबा होतो आणि चालक-वाहकांना नाराजीचा सामना करावा लागतो. मुरूड-जंजिरा हे कोकणातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग, समुद्रकिनारे आणि निसर्गसौंदर्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. अनेक पर्यटक एसटी सेवेचा वापर करतात; मात्र सीएनजी पंपाअभावी सेवा व्यवस्थापनात अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

मुरूड आगारातील सुमारे 30 बस सीएनजीवर धावत असून, केवळ काहीच बस डिझेलवर आहेत. गॅस भरण्यासाठी अलिबाग येथे थांबावे लागत असल्याने प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागते. काही प्रवासी मुरूड-अलिबागपर्यंतच तिकीट काढून पुढील प्रवासासाठी दुसरी बस पकडतात, त्यामुळे आगाराच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याची चर्चा आहे. जून 2025 मध्ये स्थानिक आमदारांच्या हस्ते पाच नवीन बसेसचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आणखी पाच बस देण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात केवळ दोन बस दाखल झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, यासंदर्भात पेण विभाग नियंत्रक चौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुरूड आगारासाठी सीएनजी पंपाचा प्रस्ताव महानगर गॅस कंपनीकडे पाठविण्यात आला होता; मात्र 30 बसेसच्या संख्येवर पंप मंजूर करणे शक्य नसल्याचे कारण देत प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. मुरूडसारख्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी सीएनजी पंप तातडीने सुरू करून एसटी सेवेचे वेळापत्रक सुरळीत करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version