। मुंबई । वृत्तसंस्था ।
पावसाळी अधिवेशनाला अखेर काही दिवस शिल्लक असताना मंत्रिमंडळाचा विस्तार कोणत्याही क्षणी होऊ शकतो. आज सकाळपासून अजित पवार यांच्या देवगिरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठींचे सत्र सुरु आहे. त्यामुळे आज संध्याकाळीच मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न होण्याची दाट शक्यता आहे.
खात्यांसंदर्भात बोलणं झाली असली तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एक गट सत्तेत सामील झाल्यामुळे आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याची पाहायला मिळत आहे. रात्री मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली होती या बैठकीत चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे देखील उपस्थित होते.
भरत गोगावले, संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे दिलीप लांडे यांच्या भेटीने चौथं नाव यांचच आहे का, असा प्रश्न सर्व आमदारांमध्ये उपस्थित झालेला आहे. खात्यांमध्ये भागीदारी वाढल्याने मंत्री पदाच्या आमदारांची संख्या कमी झाली. भरत गोगावले यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त देखील केली होती. त्यामुळे, या मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्याचबरोबर संजय शिरसाट यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवारांना अर्थ खाते देण्यास विरोध
यावेळी बच्चू कडू यांनी अजित पवारांना अर्थखाते देऊ नये, ही आमची भूमिका कायम असल्याचे सांगितले. आम्ही दुसऱ्यांच्या ग्लासमधून पाणी पिणारे नाही. आमची स्वत:ची औकाद आहे, अस्तित्व आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी जास्त लोड घेत नाही. गेल्या वर्षभरापासून विस्तार होणार-होणार, असे सांगितले जात होते. आता विस्तार झाला तर तिसऱ्या नंबरवर असणाऱ्याला पहिलं स्थान देण्यात आले. मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होणार की नाही, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कल्पना होती का, हे माहिती नाही. अजित पवारांना अर्थखाते देण्यास माझी काही हरकत नाही. पण अजित पवार यांच्याकडून भविष्यात निधीवाटपात ढवळाढवळ झाल्यास ते खपवून घेणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.