| अम्मान | वृत्तसंस्था |
कोल्हापूरच्या श्रुतिका पाटीलची 17 वर्षांखालील कुस्तीध्ये विश्वविजेती होण्याची संधी थोडक्यात हुकली आहे. अंतिम सामन्यात पराभव झाल्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले; मात्र जागतिक विजेतेपदाचा मान तिने मिळवला आहे. तसेच, या स्पर्धेतील 40 किलो वजनी गटात बाला राज आणि 53 किलो वजनी गटात मुस्कानने कांस्यपदक पटकावले आहे. मुलींच्या गटात भारताने पाच सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके पटकावली आहेत. अंतिम लढतीत काजलने हुशारीने कुस्ती खेळताना युक्रेनच्या ओलेक्सांड्रा रिबाकचे आव्हान 9-2 असे गुणांवर सहज परतवून लावले. प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व आणि ताबा राखताना काजलने बचावही भक्कम ठेवताना रिबाकला संधी मिळू दिली नाही.
उपांत्य फेरीपर्यंत सहज विजय मिळविणाऱ्या भारताच्या श्रुतिकाला जपानच्या यु कात्सुमेची आक्रमकता पेलता आली नाही. कमालीच्या वेगवान हालचाली करणाऱ्या कात्सुमेने श्रुतिकाला 39 सेकंदात तांत्रिक वर्चस्वात 13-0 असे हरवले. बाला राजने जपानच्या मोनाका युमेकावाचा 11-5, तर मुस्कानने अमेरिकेच्या इबाबेला गोन्झालेढचा 12-2 असा पराभव करून कांस्यपदकाची कमाई केली. महिला खेळाडूंनी केलेल्या यशाची पुनरावृत्ती मुलांना करता आली नाही. या सामन्यातील पाचही मल्ल उपांत्य फेरी गाठू शकले नाहीत. पाचपैकी हर्ष आणि विवेक हेच केवळ पहिला सामना जिंकू शकले. हर्षने 48 किलो गटात शानदार सुरुवात केली होती; पण उपांत्यपूर्व फेरीत त्याचा पराभव झाला.