भारताच्या ‘गब्बर’चा क्रिकेटला रामराम
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय संघाच्या गब्बरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. यामध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच, चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्याने आभार मानले आहेत.
क्रिकेटच्या मैदानावर गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने खेळाडूने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली आहे. धवनने डिसेंबर 2022 मध्ये एकदिवसीय मालिकेतील भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो सतत संघाबाहेर होता. परंतु, धवन आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसणार आहे. कारण त्याने व्हिडिओमध्ये आयपीएलमधून निवृत्तीबद्दल काहीही सांगितलेले नाही.
शिखर धवनच्या क्रिकेट करिअरबाबत बोलायचे झाल्यास, गब्बरने ऑक्टोंबर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकदिवसीय मालिकेतून भारतासाठी पदार्पण केले होते. तो भारतासाठी 34 कसोटी सामने खेळला आहे. ज्यात 58 डावात त्याने 2 हजार 315 धावा केल्या आहेत. तर 167 एकदिवसीय सामन्यात त्याने 17 शतके आणि 39 अर्धशतकांच्या जोरावर 6 हजार 793 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटबाबात बोलायचे झाल्यास त्याने 68 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 1 हजार 759 धावा केल्या आहेत. यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
‘मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय बंद करत असताना, मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि प्रेम घेऊन जात आहे. प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद! जय हिंद!'
क्रिकेटमधला गब्बर
धवन दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायचा. तो सिली पॉइंटवर क्षेत्ररक्षण करताना भरपूर स्लेजिंग करायचा. फलंदाजांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्या काळात तो ‘शोले' या सुपरहिट चित्रपटातील ‘बहुत याराना लगता है' हा डायलॉग मारायचा. ‘शोले' चित्रपटातील हा डायलॉग ‘गब्बर' नावाच्या खलनायकाची भूमिका साकारणाऱ्याचा आहे. यामुळे भारतीय संघात आल्यानंतरही देशांतर्गत क्रिकेटमधील धवनचे ‘गब्बर' हे नाव कायम राहिले.
तुटलेल्या अंगठ्याने ऑस्ट्रेलियाला धुतले
शिखर धवन म्हणाला की, आम्ही विश्वचषकात (2019) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळत होतो. मी 25 धावांवर फलंदाजी करत होतो. तेव्हा माझा अंगठा फ्रॅक्चर झाला. तो चेंडू सुमारे 150 च्या वेगाने आला होता. तो थेट माझ्या अंगावर आला आणि हातावर आदळला. वेदना कमी करण्यासाठी मी गोळ्या घेतल्या आणि दुखापत असूनही मी 117 धावा केल्या. तसेच, या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यात 127 धावांची सलामी भागीदारी झाली होती.