चांद्रयान-3 मोहिमेचा माहिती फलक

| पनवेल | प्रतिनिधी |

भारताच्या ऐतिहासिक चांद्रयान-3 मोहिमेला तीन वर्षे झाल्यानिमित्त करंजाडे येथील सेक्टर 5 ए परिसरात राष्ट्र प्रथम फाऊंडेशनच्यावतीने चांद्रयान-3 मोहिमेची माहिती देणाऱ्या फलकाचे अनावरण करण्यात आले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाच्या या अभिमानास्पद कामगिरीची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचावी आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाबाबत उत्सुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. दि.14 जुलै 2023 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान-3 अवकाशात ड्रोपावले होते. त्यानंतर भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उत्तरणारा जगातील पहिला देश होण्याचा ऐतिहासिक मान मिळवला. या मोहिमेची माहिती विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मिळावी, यासाठी राष्ट्र प्रथम फाउंडेशनच्या माध्यमातून माहिती फलक उभारण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, चांद्रयान-3 हे केवळ भारताच्या अंतराळ क्षेत्रातील यश नसून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. या मोहिमेमुळे देशातील तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि नवकल्पनांची प्रेरणा निर्माण झाली आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

Exit mobile version