यान चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले
। मुंबई । नवी दिल्ली।
चांद्रयान-3 ही भारताच्या अत्यंत महत्वकांक्षी मोहीमेकडे देशवासीयांसोबतच संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे. यादरम्यान इस्त्रोकडून चांद्रयान-3 चंद्राच्या अजून जवळ पोहचवण्यासाठी सोमवारी (दि.14) तिसरे रिडक्शन मन्युव्हर करण्यात आले.
चांद्रयान आता लंबवर्तुळाकार कक्षेतून वर्तुळाकार कक्षेत येऊ लागले आहे. इस्त्रोने आज म्हणजेच दि.14 रोजी तिसऱ्यांदा चांद्रयान-3 ची कक्षा कमी केली. आता चांद्रयान 150 किमी x 177 किमीच्या कक्षेत पोहचले आहे. म्हणजेच, चांद्रयान-3 चंद्राच्या अशा कक्षेत फिरत आहे, ज्यामध्ये त्याचे चंद्रापासून किमान अंतर 150 किमी आणि कमाल अंतर अवघे 177 किमी आहे. ही कक्षा कमी करण्यासाठी चांद्रयानाचे इंजिन थोड्या वेळासाठी चालू करण्यात आले.
इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, ऑर्बिट रिडक्शन मन्युव्हर भारतीय वेळेनुसार साडेअकरा ते साडे बाराच्या दरम्यान करण्यात आले. तसेच 23 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजून 47 मिनीटांनी चांद्रयानच्या सॉफ्ट लँडिंगची योजना असल्याची माहिती यापूर्वीत इस्त्रो प्रमुखांनी दिली आहे. चांद्रयान च्या यशस्वी लँडिंगसह भारत, अमेरिका सोवियत संघ आणि चीन यांच्यानंतर हे पराक्रम करणारा चौथा देश ठरणार आहे.