अपूर्ण रस्त्यामुळे 14 एप्रिलला ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा
| रोहा | प्रतिनिधी |
चणेरा-बिरवाडी-पांगळोली-उसर मार्गे रोहा या बहुचर्चित रस्त्याचे काम रखडल्याने चणेरा परिसरातील ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून ग्रामस्थांनी आता 14 एप्रिल रोजी ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या रस्त्यासाठी राज्य शासनाने सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून 16 ऑक्टोबर 2023 रोजी कामास सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ठेकेदाराकडून केवळ अंशतः काम करण्यात आले असून, आजही रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
या कामासाठी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. काम वेळेत पूर्ण न झाल्याने 12 मे 2025 रोजी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, पावसाचे कारण पुढे करत काम लांबणीवर टाकण्यात आले. यानंतर 31 डिसेंबर 2025 आणि पुढे 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, तरीही काम पूर्ण झालेले नाही. उलट, अपूर्ण काम असूनही ठेकेदाराला मोठ्या प्रमाणावर बिल अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्रशासन आणि ठेकेदाराच्या हलगर्जी कारभाराविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून 14 एप्रिल रोजी चणेरा नाक्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व आंदोलनकर्ते स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून ‘जेल भरो’ आंदोलन करणार असल्याची माहिती प्रकाश विचारे यांनी दिली. तसेच, वारंवार खोटी आश्वासने देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करून त्यांनाही अटक करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.







