| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
थळ मतदार संघातील जनता अनेक वर्षे विकासापासून वंचित आहे. रस्ते, पाणी, रोजगार, कोळीवाड्यांचे प्रश्न आजही जैसे थे आहेत. सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासने दिली, प्रत्यक्ष काम केले नाही. त्यामुळे येथील जनता प्रचंड कटाळलेली आहे. सानिका घरत यांच्या रुपाने शेकापने सुसंस्कृत, अभ्यासू आणि लोकाभिमुख उमेदवार दिला असून या निवडणुकीत परिवर्तन निश्चित होणार आहे, असा ठाम विश्वास शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त करुन सानिका घरत यांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत या मतदार संघात चांगले काम करीत आहेत. येथील कामगारांना किमान वेतन मिळावे, येथील पाणी, रस्ता प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. कोळीवाड्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या परिसरात त्यांनी प्रचंड काम केले आहे. यावेळी सानिका घरत यांच्या रुपाने सुशिक्षित व सुसंस्कृत उमेदवार शेकापकडून देण्यात आला आहे. यावेळी एक वेगळा इतिहास घडू शकतो, असा विश्वास आहे. त्यामुळे जिल्ह्याबरोबरच राज्याच्या राजकारणात वेगळे नाव होईल, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.







