प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचा बदलला लूक

मोफत गणवेश वाटपानंतर विद्यार्थ्यांना बूट अन्‌‍ पायमोजे

| रायगड | प्रतिनिधी |

खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसारखा लूक आता ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा दिसणार आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी आता अप टू डेट युनिफॉर्ममध्ये शाळेत जाताना दिसणार आहेत. जिल्ह्यातील 1 लाख 3 हजार 364 विद्यार्थ्यांना दोन गणवेश, बूट आणि पायमोजे देण्यात आले आहेत. यासाठी शासनाने सात कोटी 95 लाख 90 हजार 280 रुपयांचे अनुदान मंजूर करून रायगड जिल्हा परिषदेला वर्ग केले.

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आलेले अनुदान तालुकास्तरावर वर्ग केले आहे. गणवेश देण्याचे जाहीर झाल्यानंतर शाळा सुरु झाली तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. शासनाकडून निधी आल्यानंतर तातडीने शाळा व्यवस्थापन समित्यांना देण्यात आला होता. दुसरा गणवेश कधी मिळणार याची प्रतीक्षा असताना शासनाने दुसऱ्या गणवेशाचे अनुदान देखील मंजूर करून वर्ग केले. गणवेशानंतर विद्यार्थ्यांना आता बूट आणि पायमोजे देण्यासाठी अनुदान देऊ केले आहे. समग्र शिक्षा अंतर्गत सन 2021-22च्या युडायस मंजूर लाभार्थी संख्येनुसार 52403 मुली, 15912 अनुसूचित जाती मुले, 3669 अनुसूचित जमाती मुले, 9022 दारिद्य्ररेषेखालील पालकांची मुले यानुसार एकूण 81 हजार 6 लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन गणवेश संचाकरिता प्रति विद्यार्थी 600 रुपयांप्रमाणे 4 कोटी 86 लाख 3 हजार 600 रू.चा निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाला. प्राप्त निधी पीएफएमएस प्रणालीद्वारे तालुका स्तरावर वर्ग करण्यात आला आहे.

एक गणवेश संच हा शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेला व दुसरा गणवेश संच हा शासनाने निश्चित केलेला असणार आहे. 81 हजार 6 लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी 170 रुपयांप्रमाणे एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे उपलब्ध करून देण्याकरिता 1 कोटी 37 लाख 71 हजार 20 रुपयांचे अनुदान तालुका स्तरावर वर्ग करण्यात आले आहे. 22 हजार 358 जनरल व ओबीसी मुलांकरिता प्रतिविद्यार्थी 600 रुपयांप्रमाणे 1 कोटी 34 लाख 14 हजार 800 रुपयांचे अनुदान दोन गणवेश संचाकरिता मंजूर केले आहे. याच मुलांकरिता प्रतिविद्यार्थी 170 रुपयांप्रमाणे 38 लाख 860 रुपयांचे अनुदान एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून मंजूर केले आहे. असे एकूण 22 हजार 358 लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता एकूण 1 कोटी 72 लाख 15 हजार 660 रुपयांचे मंजूर अनुदान तालुका स्तरावर वर्ग करण्यात आले आहे.

Exit mobile version