जिल्ह्यात ‘पवनपुत्र हनुमान की जय’चा जयघोष

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात श्री हनुमान जन्मोत्सव जिल्ह्यात गुरुवारी (दि.2) उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विधीवत पुजेनंतर आरती झाल्यानंतर सकाळपासून भाविकांसाठी मंदिरे खुली करण्यात आली. उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील ग्रामस्थ मंडळांनी ठीक-ठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम सादर करण्यात आले. गावागावात भजनांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक काढण्यात आल्या, मिरवणुकीसोबत भजन, खालूबाजा, बेंजो आदी वाद्यांचा जल्लोष पहावयास मिळाला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हयामध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.

बार्डीगावच्या मंदिरात मारुतीरायाची दोन मूर्ती

कर्जत तालुक्यातील बार्डीगावच्या मंदिरात मारुतीरायाची दोन मूर्ती का? असा प्रश्न आजच्या पिढीला पडत आहे. एक मूर्ती गावची व एक मूर्ती सोनारांची असे सांगितले जाते. बाबुराव निघोजकर व चुलते हरिश्चंद्र निघोजकर आणि वयोवृद्ध ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्या प्रमाणे सन 1940, ते स्वातंत्र्य पूर्व काळात बार्डी गावाला आग लागली होती. त्या काळात घरे जूनी केमळीची (कुडाची) होती. त्यामुळे आग गावभर पसरली त्याची झळ मंदिराला बसली. मग मूर्ती ग्रामस्थांनी नदीच्या पाण्यात नेऊन ठेवली. काही महिने मंदिरात मूर्ती नसल्याने व मूर्ती तर पाहिजे ती ही नवीन, मग बार्डीत राहणारे ग्रामस्थ बाबुराव निघोजकर (सोनार) व हरिश्चंद्र निघोजकर (सोनार) या बंधूनी नवीन मूर्ती व रामाच्या पादुका स्वखर्चाने आणून विधीवत प्राणप्रतिष्ठा करुन मारुतीरायाची स्थापना केली. परंतु, काही महिने गेल्यावर नदीतील मारुतीराया ग्रामस्थाच्या स्वप्नात येऊ लागले मलाही मंदिरात यावयाचे आहे. पाण्यात राहायचे नाही. मग ग्रामस्थांनी एक शुभ दिवस पाहून सन्मानाने पावला पावलावर श्रीफळ वाढवून मारुतीरायांना पुन्हा मंदिरात आणून विधीवत पूजा करुन स्थापना केली. नदीतून आणताना मूर्तीच्या चेहरे जवळ दुभंगली गेली ग्रामस्थानी क्षमा मागुन ती आजपर्यंत मोठ्या भक्तीभावाने पूजा, हनुमान जयंती व पालखी काढून मोठ्या आनंदाने उत्सव, साजरा करण्यात येत आहे. तसेच मध्यांतरी सन 2012/13 रोजी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.


आक्षी-ताड येथील हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात हनुमान जनमोत्सव साजरा करण्यात आला. यनिमित्त ग्रामस्थांनी मंदिराचा गाभारा वेगवेगळ्या फुलांनी सजवला होता. (छायाचित्र: संतोष राऊळ)

परहूरपाड्यात हनुमान मंदिरा वर्धानपन दिन

श्री हनुमान मंदिरा ट्रसटच्या श्री हनुमान मंदिरा मंदिराचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात गुरुवारी (दि.2) एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. सकाळी श्रींची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती भक्तीमय वातावरणात करण्यात आली. हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मंदिराच्या ज्यांना सढळ हस्ते मदत केली त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यात मंदिराचे जुने विश्वस्त परशुराम पाटील तसेच जनार्दन घरत यांच्या सत्कार करण्यात आला.

काशिदमध्ये श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील काशिद येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. स्वच्छ सुंदर विलोभनीय समुद्र किनारा लाभलेल्या काशिद गावातील हे मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून मानले जाते. सन 2023 मध्ये लोकवर्गणीतून,सर्वांच्या सहकार्याने संकल्प करून, पुनर्बांधणी करुन आकर्षक असे मंदिर उभारण्यात आले आहे. येथील श्री हनुमान मंदीरात श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहानिमित्ताने ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्रीहनुमान जन्मोत्सव, श्रीहनुमान पाळणा, आरती, तसेच जयहनुमान प्रासादिक भजन मंडळाने सुश्राव्य बहारदार भजन सादर करण्यात आले.कार्यक्रमाचे औचित्य साधून मनोरंजनात्मक पडद्यावरील जय श्री राम चित्रपट सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशिद ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले.



Exit mobile version