कौतुकाच्या क्षणाची वाट पाहणाऱ्याचा हिरमोड
। पेण । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अक्षरशः सावळा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी 10 वाजता सुरू होणारा कार्यक्रम तब्बल अडीच तास उशिराने, दुपारी 12.30 वाजता सुरू झाला. परिणामी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सकाळी 9 वाजल्यापासून महाडमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
या सोहळ्यात जिल्ह्यातील 15 आदर्श शिक्षक आणि शिष्यवृत्तीधारक 243 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार होता. विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून मिळवलेल्या यशाचा व्यासपीठावर सन्मान होईल, अशी अपेक्षा घेऊन ते महाडमध्ये आले होते. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचा व्यासपीठावर सन्मान न करता ते ज्या ठिकाणी बसले होते, त्याच ठिकाणी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कार्यक्रम उरकण्यात आला. त्यामुळे कौतुकाच्या क्षणाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा हिरमोड झाला.
एकीकडे कार्यक्रमाला प्रचंड विलंब आणि दुसरीकडे नाट्यगृहातील एसी व्यवस्था बंद असल्याने विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व नातेवाईक उकाड्याने अक्षरशः हैराण झाले. दुपारी अडीच वाजेपर्यंत अनेक विद्यार्थी एका पाण्याच्या बाटलीवर तग धरून बसल्याचे चित्र होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी थकवा आणि नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती.
कार्यक्रमाला झालेल्या विलंबामागे लोकप्रतिनिधींच्या आगमनाची प्रतीक्षा असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. विशेष म्हणजे उशिरा येणाऱ्या मान्यवरांसाठी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तासन्तास ताटकळत ठेवणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतरही काही लोकप्रतिनिधींनी घाईघाईने कार्यक्रम आटोपून निघण्याला प्राधान्य दिल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
आयुष्यभर अध्यापन क्षेत्रात मेहनत घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार मिळिवणाऱ्या शिक्षकांसाठी हा दिवस विशेष असतो. मात्र, त्यांच्यासाठी वेळ देण्यास लोकप्रतिनिधींकडे वेळ नसेल, तर अशा पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन तरी कशासाठी, अशी संतप्त कुजबुज कार्यक्रमस्थळी ऐकायला मिळाली. जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या 243 गुणवंत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला. मात्र, त्यांच्या यशाचा यथोचित गौरव करण्याऐवजी कार्यक्रम घाईघाईने उरकण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या कष्टांचे प्रशासनाला किती मोल आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी नियोजित कार्यक्रमामध्ये बदल करत पनवेल तालुक्यातील आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर पनवेल तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन फोटोसेशन करून त्यांनी कार्यक्रमातून प्रस्थान केल्याचे दिसून आले. यामुळे इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानाला समान वेळ आणि महत्त्व मिळाले का, असा सवाल उपस्थितांकडून करण्यात आला.
दहा मिनिटांत उरकला सोहळा
पालकमंत्री कार्यक्रमस्थळी उशिरा दाखल झाल्यानंतर भाषण आणि आदर्श शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा अवघ्या काही मिनिटांत आटोपण्यात आल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. ज्यांच्या कष्टांचा गौरव करण्यासाठी संपूर्ण सोहळा आयोजित करण्यात आला, त्यांच्याच सन्मानाला वेळेची मर्यादा लावावी लागणे ही शिक्षण विभागाच्या नियोजनाची गंभीर बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
