‘नो पार्किंग’ला हरताळ, रुग्णवाहिका अडचणीत!
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, ‘नो पार्किंग’ फलकांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. यामुळे रुग्णवाहिकांनाच प्रवेश मिळत नसल्याने रुग्णांचे जीव धोक्यात येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची मनमानी आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालय परिसरात स्पष्टपणे ‘नो पार्किंग’चे फलक लावलेले असतानाही त्याच ठिकाणी बिनधास्त वाहन पार्किंग होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विशेषतः सुरक्षा केबिन आणि बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दरम्यान असलेल्या मार्गावरच वाहनांची रांग लागल्याने रुग्णवाहिकांना आत प्रवेश करणे कठीण बनले आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. मात्र, या बेफिकीर पार्किंगमुळे रुग्णवाहिकांना मार्ग काढण्यासाठी वेळ घालवावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांत तीव्र होत आहे. एवढे गंभीर प्रकार प्रशासनाच्या डोळ्यांदेखत घडत असताना कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माणगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सरोज दिनकर यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करताना सांगितले की, “मी अनेकदा रुग्णांसोबत रुग्णालयात येते. ‘नो पार्किंग’ झोनमध्येच वाहने उभी असल्यामुळे रुग्णवाहिकांना उलटसुलट हालचाली कराव्या लागतात. काही क्षणांचा विलंबसुद्धा रुग्णांच्या जीवावर बेतू शकतो.” त्यांनी पुढे सांगितले की, काही सुरक्षा रक्षक तत्परतेने मदत करतात, मात्र बहुतांश जण केवळ पाहत उभे राहतात किंवा दुर्लक्ष करतात. या पार्श्वभूमीवर दिनकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
“नो पार्किंग नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, निष्क्रिय सुरक्षा रक्षकांना तात्काळ ताकीद द्यावी आणि जबाबदारी न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी,” अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, या संदर्भात रायगड जिल्हा आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर “हे आमच्या हाताबाहेर आहे” असे सांगत जबाबदारी झटकली. या भूमिकेमुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर अधिकच शिक्कामोर्तब झाले आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी बेजबाबदार व्यवस्था कायम राहिल्यास भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.







