शिक्षकाची शाळेला सातत्याने दांडी; ग्रामस्थांचा गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद असलेली प्राथमिक शाळा कातळाचीवाडी प्रकार उघडकीस आला असून, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषक आहार योजनेत अनियमितता होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या शाळेतील शिक्षक सातत्याने गैरहजर राहणे, विनाकारण रजा घेणे, वेळेवर शाळेत हजर न राहणे, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केल्याचे समजते.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शाळेत पोषक आहार नियमित दिला जात नाही. त्याचबरोबर अनेक दिवस विद्यार्थ्यांना अन्न न मिळण्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापक समज देऊनही यामध्ये कोणतेही बदल घडले नाही, हे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत गट शिक्षणाधिकारी दीपा परब यांस लेखी निवेदन देत शाळेतील अनियमितता तातडीने दूर करावी, पोषक आहार योजना सुरळीत सुरू करावी आणि गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
राजिप कातळाचीवाडी या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांनी एक निवेदन दिले आहे. यामध्ये शिक्षक गैरहजर तसेच पोषण आहारा यासंदर्भात निवेदन दिले आहेत. नवीन वर्षात केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी, तसेच मी या शाळेची चौकशी करून, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जे काही सत्य असल्यास कारवाई केली जाईल.
दिपा परब,
गटशिक्षणाधिकारी, खालापूर







