आरोग्य विभाग झोपेत; नागरिकांकडून संताप व्यक्त
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरात सध्या माणसं राहतात की उंदीर, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने उंदरांनी अक्षरशः साम्राज्य उभारले असून, या निष्क्रियतेबद्दल उरण नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांना उपरोधिकपणे ‘आदर्श पुरस्कार’ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये कचरा दिवसेंदिवस साचून राहात आहे. दुर्गंधीने परिसर असह्य झाला असून, उंदरांचे थवे उघड्यावर मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. काही ठिकाणी परिस्थिती इतकी भयावह आहे की कचराकुंड्यांजवळ ‘उंदरांची पोल्ट्री’च तयार झाली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
यासाठी कामगार नेते संतोष पवार यांनी उपोषण ही केले होते. परंतु, परिस्थिती जैसे थे असल्याचा प्रत्यय आजही येत आहे. हा प्रशासनाचा नाकरत्येपणा म्हणावा लागेल.
उरण कोटनाका येथील मासळी मार्केट परिसरात उंदरांनी अक्षरशः थैमान घातले आहे. नागरिकांच्या मते, हा भाग आता आरोग्यासाठी धोकादायक बनला असून, संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांनी कोणतीही ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. उलट, काही तक्रारदारांचे फोन ब्लॅकलिस्ट केल्याचे आरोप होत आहेत. यामुळे प्रशासनाच्या बेफिकीरीबरोबरच नागरिकांप्रती असलेल्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वृत्तपत्रांमधून अनेकदा या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला, तरीही संबंधित अधिकाऱ्यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. “गेंड्याच्या कातडीसारखी” प्रतिक्रिया देणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शहराचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशी टीका होत आहे. आरोग्य निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील स्वच्छतेची स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आता प्रश्न एकच उरणकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या निष्क्रियतेला आळा कधी बसणार? की उंदरांच्या पोल्ट्रीसाठीच प्रशासन पुरस्कार वाटणार? अशी चर्चा जनतेत सुरु आहे.







