मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळाअभियानांतर्गत चरई बुद्रुक प्रथम

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील आदर्श गाव चरई बुद्रुक येथिल रा.जि.प.शाळा चरई बुद्रुक या शाळेने गावकऱ्यांच्या मदतीने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदर शाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ज्यामध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाद्वारे शालेय कामकाज पार पाडणे. शाळेची स्वतंत्र छत्रपती विद्यार्थी सहकारी बँक असून बँकेचे कामकाज शाखाधिकारी मार्फत पार पाडणे. शाळेचे सुसज्ज वाचनालय असुन दर शनिवारी वाचन महोत्सव अयोजित करणे. शाळेच्या आवारात 35 हून अधिक झाडे असून शाळेच्या वनमंत्री द्वारे जोपासना व निगा राखली जात आहे. भाडेतत्वावर एक गुंठा जागा घेऊन त्यामध्ये परसबागेची निर्मिती करून 20 हून अधिक भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. व पोषण आहारात या भाज्यांचा समावेश करण्यात येतो. सदर शाळा ही प्लास्टिक मुक्त शाळा असून शालेय परिसरात प्लास्टिक वापरण्यास बंदी आहे. शालेय परिसरातील प्लास्टिक टाकण्यासाठी स्वतंत्र कचरा पेटी आहे. शालेय परिसरातील झाडांचा पालापाचोळा व जेवणानंतर उरलेले उष्टे अन्न यापासून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे.

शाळेत अमृतवाटीकेची निर्मिती करण्यात आली आहे. शाळेची प्रत्येक खोली डिजिटल वर्गखोली आहे. शाळा भौतिक सुविधेने सुसज्ज आहे. प्रत्येक उपक्रमात विद्यार्थी सहभाग 100 टक्के असतो. शाळेच्या डिजिटल वर्गखोल्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे इयत्ता (1 ली) ते (4 थी) चे 100 टक्के विद्यार्थी संगणक हाताळतात. या सर्व निकषांमुळे चरई बुद्रुक शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

Exit mobile version