महावितरणतर्फे पनवेलमध्ये दोन ठिकाणी चार्जिंग स्टेशन

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

इंधनावर चालणार्‍या वाहनांमधून होणार्‍या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहन वापरण्याला प्रोत्साहन देत आहे. या धोरणाला हातभार लावण्यासाठी महावितरणने राज्यातील विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून पनवेल पालिका हद्दीत महावितरण विभागाकडून पनवेल शहर तसेच खारघर वसाहतीत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून, या चार्जिंग स्टेशनची माहिती वाहन चालकांना व्हावी याकरिता अ‍ॅपची सेवादेखील महावितरण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाढते नागरीकरण व औद्योगिकीरणामुळे रस्त्यावर धावणार्‍या वाहनाची संख्या दिवसगणित वाढत आहे. त्यातून प्रदूषणाचे दृष्टचक्र पर्यावरणभोवती आवळले जात आहे. वाहन निर्मित प्रदूषणाने अनेक शहरांमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. दळणवळणाच्या साधनाने विद्युतीकरणामध्ये रुपांतर केल्यास एका वाहनामागे अंदाजे 4.6 मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन कमी होऊ शकते. केंद्र शासनाने नेशनल मोबिलिटी मिशन 2020 केले आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता विचारात घेऊन व इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक धोरण आणले आहेत. या धोरणाला हातभार लावण्यासाठी महावितरणने राज्यातील विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून महावितरण विभागाकडून खारघर सेक्टर 2 येथील उपकेंद्र, खारघर सेक्टर 19ई येथील उपकेंद्र, याचप्रमाणे पनवेल टपाल नाका येथील उपकेंद्र या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.

या चार्जिंग स्टेशनची माहिती वाहन चालकांना व्हावी याकरिता ग्राहकांनी आपल्या मोबाईलमध्ये महावितरणचे Power up app इंस्टॉल करून MSEDCL चा पर्याय निवडावा. चार्जिंग स्टेशन महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपवर शोधणे अतिशय सोपे आहे. चार्जिंग स्टेशनच्या प्रांगणात वाहनांच्या चाचणीसाठी सोय उपलब्ध आहे. एका किलो व्हॅटसाठी इतर चार्जिंग स्टेशनपेक्षा कमी दर आहेत. तरी, महावितरणच्या वाशी मंडलातील ग्राहकांनी या चार्जिंग स्टेशनचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी केले आहे. या कामाबद्दल भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी वाशी मंडळातील कर्मचार्‍यांचे कौतुक केले.

Exit mobile version