| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील चरी कोपरपाडा गावचा सुपुत्र प्रज्योत नंदकुमार पाटील देशसेवेचे व्रत स्वीकारून भारतीय सैन्यदलात सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून रुजू होणार आहे.
प्रज्योतचे आईवडील सामान्य शेतकरी कुटुंबातील असून, त्यांनी आपल्या मुलाला योग्य शिक्षण देऊन देशसेवा करण्यासाठी सैन्यदलात दाखल केले, याबद्दल आईवडिलांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अग्निवीर ट्रेनिंग पूर्ण करून प्रज्योत चरी गावी आला, त्या आनंदाने त्याचे कुटुंबीय व चरी कोपरपाडा ग्रामस्थांच्या वतीने त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भारत माता की जय वंदे मातरम, जय जवान जय किसान, जयघोष करीत मोठ्या उत्साहाने चरी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, मुले, आबालवृद्ध, महिलावर्ग आनंदाने या मिरवणुकीत सहभागी झाला होता. याप्रसंगी चरी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच नीलिमा प्रशांत पाटील यांनी अधिक मेहनत घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. शेवटी प्रज्योत याच्या निवासस्थानी मिरवणूक समाप्त झाली.