महात्मा गांधींच्या स्वावलंबनाचे प्रतीक ‘चरखा’ अंधारात

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महात्मा गांधीजींच्या स्वावलंबनाचे प्रतीक असलेला जगातील सर्वात मोठा ‘चरखा’ सेवाग्राममध्ये उभा झाला खरा; पण देखभाल खर्चाबाबतच्या संदिग्धतेमुळे विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला असून, ‘चरखा’ सध्या अंधारात आहे. शेकडो कोटी रुपये खर्चून सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यात गांधीजींशी निगडित विचारांवर वास्तू उभ्या झाल्या. त्यातच तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चरखा उभारण्याची कल्पना पुढे आली. मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली 18 फूट उंच, 11 रूंद व 31 फूट लांबीचा ‘चरखा’ तयार केला. चरख्याच्या प्रत्येक पातीवर गांधीविचार कोरण्यात आला. सुबक प्रकाश योजनेमुळे दिनविशेषानुसार त्यावरील रंगसंगती बदलते. आता या चरख्यावर अंधार पसरला आहे. कारण तीन लाखांचे विद्युत देयक न भरल्याने ‘चरखा’ परिसराची वीज खंडित करण्यात आली आहे. ही थकबाकी जून 2020 पूर्वीची आहे. थकीत रकमेवर सतत व्याज वाढत गेल्याने आकडा फुगला. प्राप्त माहितीनुसार, पहिल्या वर्षांत जिल्हा प्रशासनांने देयक भरले. पुढे देखभाल खर्चाचा मुद्दा अस्पष्टच राहिला.

Exit mobile version