माथरानचे शार्लोट लेक फुल्ल; धबधब्यांवरही गर्दी

। माथेरान । प्रतिनिधी ।
माथेरानचे पावसाळी पर्यटन जोरात असून पावसाने येथे दिलेल्या जोरदार सलामीने घाटातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. तसेच माथेरानचा शार्लेट लेक भरून वाहू लागल्याने येथील धबधब्यावर विकेंडला पर्यटकांची तूफान गर्दी पाहवयास मिळत आहे.

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र पावसाळ्यात डोंगरदर्‍यातून तयार होणारे फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. सध्या पावसाने चांगलाच जोर धरला असून माथेरानमध्ये आता पावसाळी पर्यटन हंगाम चांगलाच जोर धरू लागला आहे. डोंगरदर्‍यांमध्ये ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, हिरवा गार निसर्ग आणि पावसाळी धुक्यातून रस्त्याने वाट शोधत जाताना पर्यटकांच्या होणार्‍या मज्जामस्तीचा वेगळाच आनंद असतो.

माथेरानमधील पावसाळी पर्यटन हंगामात पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील नेरळ ते माथेरान या रस्त्यावर लागणारा मोठा धबधबा. मुसळधार पावसातसुद्धा या धबधब्यावर शेकडोच्या संख्येने पर्यटक भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. सगळेच येथे या वॉटरफॉलची मजा घेताना दिसतात. पावसाळ्यात येथील डोंगरांवर पसरलेली हिरवी शाल, पांढरा शुभ्र कोसळणारा पाऊस त्यातच धुके व वार्‍याचा लपंडाव हे माथेरानचे पावसाळी आकर्षण असून माथेरानच्या सुरक्षित पर्यटनासाठी मागील काही वर्षांमध्ये येथे पर्यटकांचही संख्या वाढतच आहे.

माथेरानमध्ये प्रवेश करणारा प्रत्येक पर्यटक येथील शार्लेट लेकला भेट दिल्याशिवाय जात नाही. त्यातच हा तलाव भरून ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांना एक पर्वणीच मिळाली असून ह्या धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत तर प्रशासनाकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता गर्दीच्या वेळी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

Exit mobile version