| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील प्रगत शेतकरी म्हणून ओळखले जाणारे बारणे गावातील शेतकरी दशरथ मुने यांनी आपल्या शेतीमध्ये भाताची चारसुत्री लागवड केली आहे. या चारसुत्री शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मुनें यांनी परिसरातील असंख्य शेतकऱ्यांना एकत्र केले होते. दरम्यान,कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली चारसुत्री शेतीचा प्रयोग मुनें यांच्याकडून राबविला जात आहे.
खरीप आणि रगबी हंगामात भाताची शेती करणारे बारणे गावातील प्रगत शेतकरी यांच्या शेतात कृषी विभागाने यावर्षी भाताची चारसुत्री पद्धत अवलंबली आहे. खरीप हंगामात चारसुत्री भात लागवड करून घेण्यासाठी आघाडीवर असलेले प्रगत शेतकरी मुने यांनी आपल्या जमिनीत केली जाणारी नवी पध्दतीची भाताची शेती पाहण्यासाठी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्यानुसार कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड आणि मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, मंगेश पालांडे, कृषी सहायक स्मिता गावडे आणि कल्याणी कोरपड यांनी भाताची चारसुत्री लागवड करून घेताना स्वतः देखील लागवड करण्याची जबाबदारी शेतात पूर्णवेळ काम करून पार पाडली.
प्रगत शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञान वापरून भाताची शेती करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यानुसार जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले यांच्या माध्यमातून जिल्ह्यात भाताची चारसुत्री पद्घत अवलंबून शेती करावी यासाठी जिल्ह्यातील प्रगत शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. उपविभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर यांनी कर्जत आणि खालापूर तालुक्यात त्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. भोईरवाडी आणि बारणे येथील भाताची चार सूत्री लागवड कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरू आहे. दशरथ मुने या प्रगत शेतकऱ्यांनी भाताची चार सुत्र लागवड आजूबाजूच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून बोलावल्याने पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणात शेतकरी या चार सूत्र भातशेती कडे वळतील अशी अपेक्षा व्यक्त केली.