माणगावच्या चातकांना नव्या पाणी योजनेची प्रतीक्षा

माणगाव नगरपंचायतीपुढे स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठ्याचे आव्हान
। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुक्यात औद्योगिकरण वाढत आहे. त्याचा परिणाम शहरासह ग्रामीण भागावरही होत आहे. माणगाव ग्रामपंचायत अस्तिवात असताना अनेक वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेली पाणीयोजना आजही कार्यान्वित आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊन 7 वर्षे उलटली, मात्र पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यात आला नाही. परिणामी, वाढते औद्योगिकरण व लोकसंख्येमुळे तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून याठिकणी नवी योजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


माणगाव शहराच्या चारही बाजुने तुडूंब भरलेल्या नद्या आहे. असे असतानाही या परिसरात मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. माणगाव नगरपंचायतीमध्ये खांदाड, माणगाव, भादाव, नाणोरे उतेखोल अशा 5 गावांचा समावेश आहे. सध्या सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेला असला तरी त्या पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करणे गरजेचे आहे.


नगरपंचायत नागरी क्षेत्रामधील शासनाच्या पाणीपुरवठा वितरणाच्या निकषांनुसार प्रति माणसी, प्रति दिन 75 लिटर पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु माणगावमध्ये 55 लिटरच्या निकषानुसारच शहरांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात तेही पाणी अपुरे पडत असून बरेच ठिकाणी तर पाणीच पोहोचत नाही.

आश्‍वासनांची पूर्तता कधी होणार?
22 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री आदिती तटकरेंना लेखी निवेदनातून नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी निधीची मागणी केली होती. मात्र हा प्रश्‍न तसाच प्रलंबित राहिला. नगरपंचायत ही शिवसेनेच्या ताब्यात असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माणगावच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न मार्गी लावू. तसेच शहरातील गटारातून काळ नदीला जाणार्‍या सांडपाण्याचा निचरा, विल्हेवाट, काळ नदी प्रदूषणमुक्त करण्याची पोकळ आश्‍वासने दिली होती. मात्र ती अद्यापही पूर्ण झाली नाहीत. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 7 कोटी रुपये अपेक्षित आहे. मात्र हा निधी नगरपंचायतीकडे नसल्याने तो शासनाकडून उपलब्ध झाल्यास माणगावचा पाणीप्रश्‍न कायमचा निकाली लागेल.

अपुरी वितरण व्यवस्था
सध्या माणगाव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 4 पाणी साठवण टाक्या आहेत. काळ नदीवर उभारण्यात आलेल्या जॅक्वेलमधून साठवण टाकीत पाणी सोडण्यात येते. तसेच शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यानंतर शहराला पाणीपुरवठा केला जातो. दररोज सुमारे 25 लाख लिटर पाणी दिले जाते. वाढत्या नागरिकीकरणामुळे शहरामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी अस्तिवात असलेली वितरण व्यवस्था अपुरी पडत असल्याने अनेक विभागातून पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सध्या शहराच्या काही भागांमध्ये नदीवर पंप बसवून अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचीही बाब समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे माणगाव, खांदाड, मुंबई-गोवा महामार्गावरील राठोड हॉस्पिटल पर्यंतचा परिसर (पूर्व भाग) व उतेखोल, भादाव नाणोरे (पश्‍चिम भाग) अशा दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्यास शहरातील पाणीपुरवठ्याबाबतची भविष्यातील समस्या दूर होईल.

Exit mobile version