| नेरळ | प्रतिनिधी |
मॉग्रेज ग्रामपंचायत मधील चौधरवाडी येथे बत्ती गुल झाली आहे. त्या गावातील वीज पुरवठा करणार्या वीज रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने या ठिकाणी राहणार्या आदिवासी लोकांच्या घरातील वीज गायब झाली आहे. दरम्यान, स्थानिक कार्यकर्त्यांनी चौधरवाडी येथे नवीन वीज रोहित्र मिळावे यासाठी प्रयत्न सुरु केले असून सोमवार पर्यंत या गावातील वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
या गावातील वीज पुरवठा 18 जानेवारी पासून खंडित झाली आहे. त्या ठिकणी असलेले 63 केव्हीए क्षमतेचे असून तेथील 45 घरांच्या वस्तीसाठी वीज पुरविली जात होती. वीज रोहित्रामध्ये बिघाड झाल्यानंतर महावितरण कंपनीकडून दोन दिवसांनी वीज रोहित्र काढून पनवेल येथे दुरुस्ती साठी नेण्यात आले आहे. मात्र ते रोहित्र पनवेल येथून दुरुस्त करून आणण्यात आले नसल्याने वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे या वाडी मधील आदिवासी लोकांच्या घरात अंधार दाटला आहे. त्याबद्दल स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी या ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विलास भला यांच्याकडून महावितरण कडे पाठपुरावा सुरु होता. मात्र महावितरण कडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने गेली पाच दिवस चौधरवाडी अंधारात आहे.
त्यानांतर ग्रामस्थांनी या भागातील तरुण कार्यकर्ते भास्कर दिसले यांची भेट घेऊन महावितरण कडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. शेवटी भास्कर दिसले यांनी महावितरणाचे सहायक अभियंता आणि शाखा अभियंता यांच्याशी संपर्क साधून वीज रोहित्र बद्दल कडक शब्दात समज दिली आहे. त्यामुळे सोमवार पर्यंत चौधरवाडी मधील वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी वीज गायब असल्याने आदिवासी ग्रामस्थ यांच्याकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.