प्रि-वेडिंगसाठी चौल-रेवदंड्याला पसंती

पर्यटनास पूरक व्यवसाय असल्याने सुविधा द्याव्यात; स्थानिक ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी

| रेवदंडा | वार्ताहर |

नारळ-सुपारीच्या बागांनी रेवदंडा व चौलच्या वातावरणात समतोल राहिला असून, निसर्गाचे वरदान ठरलेल्या परिसराला लांबलचक दोन किमीचा अंतराचा सुरक्षित समुद्र किनारा, समुद्रलगत आगरकोट किल्ला व किल्ला भोवतालची तटबंदी पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या निसर्गरम्य परिसरात प्रि-वेडिंग शूटिंगसाठी अवघ्या महाराष्ट्रातून फोटोग्राफर्स भेटी देतात. रेवदंड्यातील पर्यटनास प्रि-वेडिंग फोटोग्राफी शूटिंग पूरक ठरली असून, त्यासाठी आवश्यक सुविधा संबंधितांनी पुरवाव्यात, अशी मागणी समस्त ग्रामस्थ करीत आहेत.

प्रि-वेडिंगसाठी मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील फोटोग्राफर्स निसर्गरम्य असलेल्या रेवदंडा व चौल परिसरात येतात. प्रि-वेडिंगसाठी वधू-वर, तसेच सोबतीला मित्रमंडळी, सगेसोयरे फोटोग्राफरसह त्यांचे सहकारी असा लवाजमा असतो. चौलमधील रामेश्‍वर मंदिर, शितळादेवी मंदिर, चौल भोवाळे पर्वतवासी दत्त मंदिर, भगवती मंदिर, हिंगुळजा देवी मंदिर या निसर्गरम्य परिसरासह विशेषतः रेवदंडा समुद्रकिनारी व समुद्रालगत आगरकोट किल्ला व तटबंदी परिसरात शूटिंगसाठी पसंती देतात. त्यामुळे हा परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला येत आहे. येथील परिसरात हॉटेल, लॉजिंग तसेच कॅम्पींग व्यवसायात मोठी वाढ होत आहे. शिवाय, रिक्षा, सितारे, थंडपेय दुकाने, छोटी-मोठी दुकाने यांना व्यवसायास संधी उपलब्ध होत असून, अनेकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. स्थानिक ग्रामस्थांची आर्थिक रेलचेल वाढीस जात असून, येथील आर्थिकता वाढीस जात आहे. रेवदंडा व चौल परिसरातचा कायापालट होत असल्याचे चित्र दिसते.

रेवदंडा पर्यटनास पूरक ठरलेल्या प्रि-वेडिंग फोटोग्राफीला संबंधितानी विविध सुविधा द्याव्यात, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. विशेषतः रेवदंडा समुद्र किनारी, आगरकोट किल्ला व आगरकोट किल्ला तटबंदी परिसरात ड्रोन शूटिंगसाठी शासकीय नियमात बदल करण्यात येऊन परवानगी द्यावी, अशी मागणी रेवदंडा ग्रामस्थ करत असून, याबाबत लवकरच शासन दरबारी निवेदन सादर करण्यात येणार आहे.

Exit mobile version