महिलेची लाखोंची फसवणूक

। छत्रपती संभाजीनगर । वृत्तसंस्था ।

तोतया सायबर पोलिसांनी महिलेची 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यात महिलेला अशी धमकी देण्यात आली की, ‘तुमच्या आधार कार्डवर एक नंबर घेण्यात आला आहे. या नंबरवरून मनी लॉड्रिंग होत असल्याचा संशय आहे. या आधारे मोठी कारवाई केली जाईल.’ या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16 मार्च 2024 रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान बीड बायपास रोडवर राहणाऱ्या एका महिलेला 7388170593 वरून कॉल आला. त्याने स्वत:चे नाव संजीतकुमार असून तो ट्रायल डिपार्टमेंट नोटिफिकेशन युनिट येथून बोलत असल्याचे सांगून तुमच्या आधार कार्डवरून एक नंबर घेण्यात आल्याचे सांगितले. सदर नंबर हा महिलेच्या आधार कार्डाचा होता. महिलेने आपण कोणत्याही प्रकारचा नंबर घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले. सदर प्रकरणात तुम्हाला ऑनलाइन तक्रार करावी लागणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार, महिलेला मोबाइलवर स्काइप नावाचा अॅप डाउन लोड करून घेऊन या ठिकाणी ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला. सदर महिलेला तिच्या आधार कार्डावरील नंबरवरून मनी लॉड्रींग होत असल्याचे सांगत, तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल. तुम्हाला अटक करण्यात येईल. असेही सांगण्यात आले. यानंतर तिला स्काइपवरून 17 लाख 28 हजार रुपये एका खात्यावर भरण्यासाठी लावून या महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी मोबाइलधारकाच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.

Exit mobile version