फसवणं हा तटकरेंचा जन्मसिद्ध हक्क; आ. जयंत पाटील यांचा घणाघात

| पुणे | प्रतिनिधी |

मागे वळून पाहिले तर प्रत्येकवेळी आघाडीने आपली फसवणूक केली आहे. अलिबाग, सांगोलामध्ये त्याचा प्रत्यय आपण अनुभवला आहे. त्यामुळे आपले नुकसानही झाले. मात्र आपण कायमच प्रामाणिक राहिलो. फसवणं, सत्तेसाठी विश्वासघात करणं हा खा. सुनिल तटकरेंचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे भूतकाळात केलेल्या चुकांची पुनरावतवृत्ती यापुढे होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यायची असल्याचे आवाहन शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी केले आहे.

पुणे येथे आयोजित सत्ता परिवर्तन शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. बाळाराम पाटील, शेकापचे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, कॉ. डॉ. भालचंद्र कांगो, भारत पाटणकर, आ. श्यामसुंदर शिंदे, भाकपचे भालचंद्र कानगो, जनता दलाचे उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, माजी आ. पंडीत पाटील, शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नाथाभाऊ शेवाळे (प्रभारी अध्यक्ष, जनता दल (सेक्यूलर), प्रा. एस. व्ही. जाधव, कॉ.डॉ. भालचंद्र कांगो, (भाकपा), डॉ. सुरेश माने (अध्यक्ष, बीआरएसपी), डॉ. राम पुनियानी, कॉ. उदय भट, कॉ. विजय कुलकर्णी (लाल निशाण), प्रताप होगाडे (जनता दल (सेक्यूलर), कॉ. किशोर ढमाले (सत्यशोधक कम्यूनिस्ट पक्ष), रमेश पाटील (बीआरएसपी), श्यामदादा गायकवाड (अध्यक्ष, आरपीआय (सेक्यूलर), कॉ. डॉ. भारत पाटणकर (श्रमिक मुक्ती दल), कॉ. अजित पाटील (सीपीआय (एमएल) सेक्यूलर), तसेच घटक पक्षाचे पदाधिकारी, नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले की, प्रागतिक पक्षाचा इतिहास चवळवळीचा आहे. प्रागतिक पक्षाचा जन्मही चळवळीतच झाला. त्यामुळे चळवळ कशी करायची हे कोणाकडून शिकण्याची गरज नाही.कारण बीजेपीविरोधी भूमिका घेणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तात चळवळ आहे. यापुढे प्रागतिक पक्ष कायम ठेवायचा आहे. नवी आघाडी करताना प्रत्येक पक्षप्रमुखांनी एकवाक्यता ठेवणे गरजेचे आहे. आपण कायमच जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडले. त्यासाठी लढलो, मात्र आता संघटना मजबूत करायची आहे. भाजपविरोधी संघटनांना एकत्र आणायचे आहे. तरुणांना संधी देत दिल्लीत पोहोचायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

आज महाराष्ट्राच्या राजकाराणात अनेक अनपेक्षित बदल झाले आहेत. सत्तेसाठी आज कोण कुठे असेल माहित नाही. मात्र शेकापचे उद्धवराव पाटील यांना त्यावेळी मुख्यमंत्रीपदाची विचारणा झाली असता त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले, ही अभिमानाची गोष्ट आहे.

आ.जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस

जनमत संघटित करा
फोडाफोडीचे, खोक्याचे राजकारणाविरोधात जनमत संघटित करण्याचे काम तरुण कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी संघटनावाढीसाठी तयारीला लागा. आता जिथे लढायचे तिथे जिंकूनच यायचे. विभागवार बैठका घेण्यात येणार आहेत. याची सुरुवात कोल्हापूर येथून करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांना गावपातळीवर पक्षाची बाजू मांडायची आहे. तरुणांना संधी मिळणार असून वक्ते तयार करा, असेही आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

प्रागतिक पक्षाची पार्श्वभूमी
प्रागतिक पक्षाची स्थापना करण्यासाठी गेले दिड वर्षे नेत्यांच्या बैठका, चर्चा केल्या जात आहेत. सत्ता परिवर्तनासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. पक्षाचे नाव निश्चित करण्यासाठीच जवळपास 10 बैठका घेण्यात आल्या आहे. पक्षाची एकजूट करीत असताना राजकिय परिस्थिती वेगळी होती. आता जी परिस्थिती ओढावली आहे, ती प्रागतिक पक्षासाठी पोषक असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

सरकार पडणार
येत्या काही दिवसांतच शिंदे सरकार पडणार असल्याची शक्यता आहे. कायद्याच्या चौकटीत राहून विचार केला असता हे सरकार पडणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सांगत आ. जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय विधीमंडळ अध्यक्षांच्या निकाल देण्याच्या मर्यादा याबाबत विश्लेषण केले.

Exit mobile version