| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
कार्यालयात जमा असलेली रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी गेलेल्या एका कर्मचार्याकडील 4 लाख 30 हजारांची रोख रक्कम घेऊन एका भामट्याने पलायन केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
वाशीतील गुडविल डेव्हलपर्स कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात कामाला असलेले आशीष शर्मा (वय 38) दरदिवशी कंपनीच्या कार्यालयात जमा होणारी रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि.23) देखील आशीष यांनी कार्यालयात जमा असलेली रक्कम बँकेत भरण्यासाठी गेले होते. यावेळी आशीष यांनी रक्कम कॅश काऊंटरवर दिल्यानंतर फारुख नावाच्या भामट्याने त्याच्याशी ओळख दाखवून त्यांच्या कंपनीतील अकाउंटंट परेश तसेच शब्बीर यांना तो ओळखत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्याही कंपनीचा अडीच लाख रुपयांचा चेक व 9 लाख रुपयांची रोख रक्कम बँक खात्यात भरण्यासाठी आल्याचे भासवून एक चेक आशीषला दाखवला. तसेच फारुखने आशीषला बोलण्यात गुंतवून त्याच्याजवळ असलेली 4 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पलायन केले.