कार्यक्रमाला आणून आमची फसवणूक

बचत गटांच्या महिलांमध्ये संतापाचे वातावरण

| अलिबाग | वार्ताहर |

तालुक्यातील बहुतांश बचतगटांच्या महिलांना नवी मुंबई येथे ‌‘नमो महिला सक्षमीकरण’ कार्यक्रमातंर्गत बैठक असल्याचे खोटे कारण सांगून एसटी बसमधून घेऊन गेल्याचे मेसेज समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याची चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी घेऊन आल्याचा आरोप संबंधित महिलांनी केला आहे. याबाबत महिलांना उपस्थित राहण्याचे आदेश पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने दिल्याचेही बोलले जाते. याबाबत अधिकाऱ्याशी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, फसवणूक झालेल्या महिलांमध्ये संतापाचे वातावण आहे.

या घोर फसवणुकीबद्दल अनेक महिलांनी घेऊन गेलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना खोटे सांगून आणल्याबद्दल संताप व्यक्त करत जाब विचारला, तसेच आम्हाला या कार्यक्रमाला यायचे नाही, तुम्ही आम्हाला आमच्या घरी सोडा असे सांगितले असता यावेळी संबंधित अधिकारी यांनी सारवासारव करत महिलांना शांत करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांनी महिलांना लवकरच कार्यक्रम संपन्न होईल, तेव्हा आम्ही बसने घरी सोडू, असे सांगितले. मात्र, महिला आता पुन्हा घरी कसे जाणार या चिंतेत होत्या, त्यामुळे त्यांना कार्यक्रम होईपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात येणार होते. यासोबतच नेरुळ-उरण रेल्वे, नवी मुंबई येथील पेंधर-बेलापूर मेट्रो मार्गाचे उद्घाटन अशा अनेक कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात येणार होते. या कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या महिलांना संबंधित अधिकारी व प्रशासनाने योग्य तो खुलासा न करता नवी मुंबई येथे नमो महिला सक्षमीकरण बाबतीत बैठक असल्याचे कारण सांगून आणल्याचे प्रकार घडला आहे. याबाबत अलिबाग तालुक्यासह इतर तालुक्यांतील अनेक महिला बचत गटाच्या महिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर संतप्त प्रतिक्रिया दिली.

खाण्यापिण्याची आबाळ
या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणल्यानंतर पिण्याच्या पाण्याची व अल्पोपाहार तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात प्रशासन कमी पडले, यावेळी अनेक महिलांना जेवणदेखील न मिळाल्याचे सांगितले. पंतप्रधानाच्या कार्यक्रमाला जायचे असे सांगितले नसते, तर आलोच नसतो. अधिकारी व त्यांच्या प्रशासकीय लोकांनी आमची फसवणूक करून आम्हाला अंधारात ठेवले, असा आरोप करीत अनेक महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
Exit mobile version