। राजापूर । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर जवळील पन्हळे माळवाडी येथे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला भीषण आग लागली. ही घटना शनिवारी (दि. 19) सकाळी नऊच्या सुमारास घडली. येथील ग्रामस्थांनी या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या लेनवरुन सोडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून मुंबईच्या दिशेने केमिकल वाहून नेणारा टँकर राजापूर तालुक्यातील पन्हळे माळवाडी येथे आला असता त्याला अचानक आग लागली. हवेत धुराचे लोट पसरल्याने ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुंबईच्या दिशेने असणारी वाहतूक थांबवून दुसऱ्या एकेरी मार्गावरुन वळवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मात्र, एक तासाहून अधिक काळ लोटला तरी ही आग अटोक्यात आणण्यासाठी तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापण यंत्रणेने कोणतीच हालचाल न केल्याने व अग्निशमन यंत्रणाही घटनास्थळी न पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.





