। नवीन पनवेल । वार्ताहर ।
तळोजा एमआयडीसीतील पावसाळी पाणी वाहून नेणार्या गटारात केमिकलचे पाणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. न्यू केमिकल झोनमध्ये गटारातील पाणी मोटरच्या साह्याने सीईटीपीला सोडण्यात येणार्या चेंबरमध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारे केमिकल मिश्रित पाणी सीईटीपीच्या चेंबरमध्ये न सोडता गटारामध्ये सोडणार्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
तळोजा एमआयडीसीत साडेआठशेहून अधिक कारखाने आहेत. यापैकी जवळपास तीनशेहून अधिक कारखाने केमिकलचे आहेत. बहुतांशी कारखान्याचे सांडपाणी सीईटीपीच्या प्लांट मध्ये येतच नाही. काही कंपन्यांनी बाहेरच्या बाहेर लाईन टाकून ते सांडपाणी नदीत सोडण्याची बेकायदेशीर व्यवस्था करून घेतलेली आहे. याविरोधात एमआयडीसी कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. तळोजा एमआयडीसीतील न्यू केमिकल झोनमध्ये प्लॉट नंबर 73 जवळील गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचे पाणी सोडण्यात आलेले आहे. हे केमिकलचे पाणी मोटारीच्या सहाय्याने सीईटीपीच्या चेंबरमध्ये टाकण्यात येत आहे. या मोटारीला विद्युत पुरवठा कोणी केला व ही मोटर कोणी बसवली हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
ज्याअर्थी गटारातील केमिकलचे पाणी मोटारीच्या सहाय्याने सीईटीपीच्या चेंबरमध्ये टाकले जात आहे, त्याअर्थी गटारात कोणतीही प्रक्रिया न करता सोडले गेलेले सांडपाणी हे केमिकलचे पाणी असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र हे एमआयडीसीच्या अधिकार्यांना दिसत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे एमआयडीसी व कारखानदार यांच्या संगनमताने गटारात केमिकलचे पाणी विना प्रक्रिया सोडण्याचे प्रकार होत असल्याचे आरोप तलोजा पर्यावरण विभाग अध्यक्ष सुनील भोईर यांच्याकडून केला जात आहे. याबाबत एमआयडीसीचे अभियंता संजय ननावरे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यानी फोन उचलला नाही. यावरून ननावरे याना किती काळजी असेल हे दिसून येते.