अंबा नदीत रसायनमिश्रित पाणी

नागरिकांच्या आरोग्यास धोका

| पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातून वाहणार्‍या अंबा नदीच्या पात्रात लालसर व पिवळसर पाण्याचा तवंग वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. या नदीशेजारी रासळ गावाजवळील सनशिल्ड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीजवळील नाल्यात रसायनयुक्त दूषित सांडपाणी सोडले जात असल्याचे येथील स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे. हे पाणी अंबा नदीत मिळत असल्याने तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कंपनीतील रसायनयुक्त सांडपाणी अनेक दिवसांपासून नाल्यात मोठ्या प्रमाणात सोडले जाता आहे. हा नाला अंबा नदीच्या जवळ असल्याने नाल्यातील दूषित सांडपाणी थेट अंबा नदी पात्रात जाऊन मिळत आहे. अंबा नदीजवळ अनेक गावे आहेत. तसेच या गावांना अंबा नदीतूनच पाणीपुरवठा होतो. या दूषित सांडपाण्यामुळे सुधागड तालुक्यातील अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक करीत असून, लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Exit mobile version