बाबुरावांच्या एम टॉनिककडे छबुरावांचे लागले डोळे

धगधगत्या ‘अनंत मशालीं’ चे कडवे आव्हान पेलवेना

| रायगड | आविष्कार देसाई |

एका आटपाट नगरातील अंधभक्त दिल्लीतील हुकूमशहाला तिसर्‍यांदा राज सिंहासनावर बसवण्याच्या तयारी लागले आहेत. यासाठी बाबूराव यांनी आपल्याच घटक पक्षातील इच्छुक असणार्‍या छबूरावांना मात दिली आणि निवडणुकीचे तिकट आपल्याच खिशात घातले. त्यामुळे छबुराव आणि त्यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले. युतीमधील काही प्रमुख सुभेदार हे आधीपासूनच बाबूरावांच्या कार्य प्रणालीवर नाराज आहेत. व्हिटामिन ‘एम’ टॉनिकचा डोस मिळत नाही, तोपर्यंत प्रचारालाच येणार नसल्याचा पवित्रा सर्वच छबुरावांनी घेतला आहे. त्यामुळे हुकूमशहाचे तख्त आता हलू लागले आहे.

सर्व छबुरावांना ‘एम’ टॉनिक देऊन ते आपल्यासोबत दगाफटका तर करणार नाहीत ना, असा प्रश्‍न बाबूराव यांना पडला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर फार मोठा पेच निर्माण झाला आहे. भारत एकजुटीच्या ‘अनंत’ मशालीचे कडवे आव्हान पेलण्यासाठी बाबूरावांनी अन्य पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ते प्रत्येक प्रांतात आपल्या निवडक हुजर्‍यांसह रात्रीचा दिवस करु लागले आहेत. मात्र, प्रजेतून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. तोंडावर मदत करण्याचे आश्‍वासन मिळत असले, तरी पाठ फिरल्यावर प्रजा नाक मुरडत आहे. दलीत, मुस्लिम यांनी तर मशाल दिल्लीत पोचवण्याचा निर्धार केला आहे.

दिल्लीच्या तख्तावर राजाला पुन्हा बसवण्यासाठी प्रजेला गुमराह करण्यात येत आहे, तर दुसरीकडे राज्याचे संविधान वाचवण्यासाठी एक धगधगती ‘अनंत मशाल’ पुढे सरकत आहे. या धगधगत्या मशालीच्या उजेडात अनेक कामगार, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा, वंचित, उपेक्षीत घटक सामावले आहेत. दिल्लीचे सिंहासन उलथून लावण्याएवढे बळ आई भवानीने मनगटात द्यावे, अशी आराधना आता घराघरातून केली जाऊ लागली आहे. मशाल दिल्लीपर्यंत तेवत रहावी, यासाठी आटपाट नगरातील काही अनुभवी मंडळी सोबत आली आहेत. बाबूराव यांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे.

अचानक उन्हाच्या झळा वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. आधीच विविध बाजूने चटके बसून करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘एम’ टॉनिक घेऊन आपला किमान बचाव तरी करता येईल, अशी धारणा छबूरावांसह अन्य मदत करणार्‍यांची झाली आहे. ‘एम’ टॉनिकचा बूस्टर डोस प्यायल्यावर छबूरावांचा चमू आपल्यासाठी शत्रूशी दोन हात करणार नसल्याची भीती बाबूराव यांना वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रातांतील सुभेदारांकडे ‘एम’ टॉनिक पोहचलेले नसल्याने ते त्याची वाट पाहत आहेत.

Exit mobile version