छत्रपती शाहू महाराज सभागृह कधी होणार सुरू; खोपोलीकरांना पडलाय प्रश्‍न

। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीच्या गेल्या काही वर्षाच्या संदर्भात सांस्कृतिक अधिष्ठनात मानाचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या छत्रपती शाहू महाराज सभागृह आता पुन्हा कधी सुरू होणार हा प्रश्‍न खोपोलीकरांसमोर उभा राहिला आहे. कोरोना महामारीचे भय आता संपत आले आहे. लॉकडाऊनचे नियम देखील शिथील झाले आहेत. महाराष्ट्रातली नव्हे तर संपूर्ण देशभरातील थियेटर, नाट्यगृह, सार्वजनिक सभागृह, मंगल कार्यालये मोठा गाजावाजा करत नव्या उत्साहाने सुरू झाली आहेत. त्याचे परिणाम खोपोली दिसून येत असले तरी छत्रपती शाहू महाराज सभागृह सुरु होण्याचे चिन्हे मात्र दिसून येत नाहीयेत.

खोपोलीतील ज्येष्ठ रंगकर्मी उल्हासराव देशमुख, नाट्यरसिक प्रवीण शिरसागर, संतोष कोळपकर, प्रवीण पुरी, निशा दळवी, प्रकाश राजोपाध्ये, नितीन भावे, गुरुनाथ साठेलकर असे अनेकजण याबाबतीत खंत व्यक्त करत आहेत. काल-परवा खोपोलीतील उपनगरात रस्ता नाही म्हणून नागरिक उपोषणास बसले होते. मात्र लागलीच त्या आंदोलनाची दखल घेऊन खोपोली पालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासनाने लागोलाग रस्ता निर्मितीसाठी पाऊल उचलले. तशाच स्वरूपाचे उपोषण कलारसिकांनी करावे असा संकल्प केल्यास त्याची परिणीती म्हणून सभागृह सुरू झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने असलेल्या स्मारकांची पवित्रता जपणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान ठेवल्यास याच उद्देशाने छत्रपती शाहूमहाराज सभागृह कार्यक्रमासाठी दरवाजे उघडतील आणि पडदा उघडण्यासाठी घंटा वाजेल. याचीच खोपोलीकर वाट बघत आहेत.

Exit mobile version