छत्रपती शिवाजी महाराज चषक

श्री महागणपती क्रिकेट संघ विजयी

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील धाकटीजुई येथील फ्रीडम ग्रुप व मैत्री मिलिंद, विनोद स्पोर्ट्सच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नाईट क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद श्री महागणपती चिरनेर क्रिकेट संघाने पटकाविले. त्यांना प्रथम क्रमांकाचे छत्रपती शिवाजी महाराज चषक व 1 लाख रुपये असे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

उपविजेतेपद गावदेवी पेण क्रिकेट संघाने जिंकले. त्यांना 50 हजार रुपये व छत्रपती शिवाजी महाराज चषक देण्यात आले. विनोद स्पोर्ट्स गावठाण क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना 25 हजार रुपये व छत्रपती शिवाजी महाराज चषक देण्यात आले. तर, अक्कादेवी मोठीजुई क्रिकेट संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. त्यांना 25 हजार रुपये व छत्रपती शिवाजी महाराज चषक प्रदान करण्यात आले. याशिवाय चिरनेरच्या संघातील साहिल चव्हाण या खेळाडूला मालिकावीर, गावठाण संघातील अंकुश टकले या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज, मोठीजुई संघातील अंकेश कामोठकर या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज तर कळवे पेणच्या संघातील सुशांत मोकल या खेळाडूला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब देण्यात आला.

या क्रिकेट स्पर्धेत 38 संघानी आपला सहभाग नोंदविला होता. तसेच, प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक देण्यात आला. या स्पर्धेसाठी नामांकित पंच व उत्कृष्ट समालोचक यांना निमंत्रित करण्यात आले होते. फ्रीडम ग्रुप व मैत्री मिलिंद, विनोद स्पोर्ट्स संघ धाकटीजुई मार्फत क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.

Exit mobile version