टॉनिक संपले! महेंद्र दळवी पुन्हा गुवाहाटीला निघाले

। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोरी करणारे त्यांचे सर्व आमदार, खासदार दि.21 नोव्हेंबरला गुवाहाटी दौर्‍यावर जाणार आहे. तेथील कामाख्य देवीच्या दर्शनासाठी हा दौरा आयोजित केला आहे. सत्तांतर होताना शिंदे गट गुवाहाटीत वास्तव्य करुन होता. यावेळी शिंदे यांनी कामाख्य देवीची पुजाही केली होती. त्यावेळी सत्ता स्थापनेनंतर पुन्हा सर्वजण दर्शनासाठी येऊ, असे ते बोलले होते. सत्तातरानंतर विरोधकांनी 50 खोक्यांवरुन बंडखोरांचे पितळ उघडे केले. अनेक आरोप-प्रत्यारोपही करण्यात आले.

अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे देखील त्या बंडखोरीचा एक भाग होते. त्यामुळे महेंद्र दळवी 50 खोके घेऊन आल्याची चर्चा जनतेमध्ये जोरदार सुरुच राहिली. अशातच आता पुन्हा बंडखोर गुवाहाटीला जाणार असल्याचे निश्‍चित झाले. त्यामुळे बंडखोरांचे 50 खोक्यांचे टॉनिक संपले कि, काय, असा प्रश्‍न सर्वज्ञात जनतेने उपस्थित केला आहे.

सुरवातीला काँग्रेस मग राष्ट्रवादी, शेकाप त्यानंतर शिवसैनिक आणि आता शिंदेसैनिक असलेले महेंद्र दळवी कट्टर शिवसैनिक कसे, असा प्रश्‍नही जनतेने उपस्थित केला आहे. गुवाहाटीमुळे चर्चेत आलेल्या आणि टॉनिकच्या जोरावर जनतेला विकत घेऊ पाहणार्‍या दळवींना मतदार जागा दाखवेल, असे मत कट्टर शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे.

सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी जी पूजा केली त्याच प्रकारची ही खास पूजा असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दौर्‍यादरम्यान शिंदे गुवाहाटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांनाही ते भेटणार आहेत.

Exit mobile version