मुख्यमंत्री साहेब, आम्हाला घरे कधी मिळणार?

कंटेनरमध्ये जीव कोंडतोय, इर्शाळवाडी दरडग्रस्तांनी मांडली व्यथा

| पाली/बेणसे | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर 19 जुलै 2023 रोजी मध्यरात्री काळाने घाला घातला. मुसळधार पावसात दरड कोसळून 84 निष्पाप नागरिकांचा मातीच्या ढिगार्‍यात गाढल्याने मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने दरडग्रस्त नागरिकांना इर्शाळवाडीच्या पायथ्याशी चौक क्षेत्रात तात्पुरत्या निवार्‍याची कंटेनरमध्ये राहण्याची व्यवस्था केली. मात्र, इथे आजही नागरिकांना कष्टप्रद आणि संघर्षमय जीवन जगावे लागत आहे. याठिकाणी मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधांचे तीनतेरा वाजल्याची परिस्थिती आहे. कुणी घर देता का घर, इर्शाळवाडी दरडग्रस्त ग्रामस्थांवर पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन कंटेनरमध्ये राहण्याची वेळ आली आहे. याठिकाणी पाणी, आरोग्य, शौचालय, स्वच्छतागृहाची दुरवस्था, पाण्याचा अभाव आदी समस्यांचा सामना येथील नागरिकांना दैनंदिन करावा लागतोय. आम्हाला इथे आणून ठेवल आहे खरं; पण आमच्याकडे ढुंकून बघायलाही कुणाला वेळ नाही, अशी व्यथा येथील संतप्त महिलांनी मांडली.

मागील वर्षी स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीच्या पुनर्वसन केलेल्या तात्पुरत्या कंटेनर हाऊसमधील निवारा ठिकाणी भेट दिली, अधिकारी आणि दुर्घटनाग्रस्त यांच्याशी चर्चा करून पुनर्वसनाबाबत आराखडा, जागा, तेथील दळणवळण विकास यावर चर्चा करून रोजगाराबाबत तरुणांना नोकरी देण्याची हमी दिली होती. सर्व सोयी सुविधा उपलब्द करून सहा महिन्यांत इर्शाळवाडीचे पुनर्वसन करू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, अजून पुनर्वसन झाले नसल्याचे दरडग्रस्त नागरिकांचे म्हणणे आहे.

इथे तात्पुरत्या निवारा शेडमध्ये (कंटेनर) राहणारे बामा जानू पारधी यांनी यावेळी समस्यांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, उन्हाळ्यात कंटेनरमध्ये उकाड्याने खूप त्रस्त झालो, तर आता पावसाळ्यात कंटेनरमध्ये पावसाचे पाणी शिरून घरातले साहित्य, अंथरून भिजत आहे. आम्ही पावसामुळं रात्री उठून बसतो. दरवाजा उघडला तर पाणी आत शिरते, दरवाजा बंद केला तर उकाडा होतो. सरकारने आम्हाला घरे देण्याचे आश्‍वासन दिले होते, मदत करण्याचे बोलले होते, ते अजून पूर्ण केलं नाही. आमच्या मुलांना नोकर्‍या देऊ म्हटले होते, पण कुठं नोकर्‍या दिल्या नाहीत, म्हणून ते वेठबिगारी करतात.

यावेळी बुधाजी हिरू पारधी म्हणाले की, इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यावर आम्हाला सरकारने इथे आणून ठेवला. पण आमची इथे काही सोय नाही. कंटेनरमध्ये आम्ही राहतो, इथे प्यायला पाणी नाही, शौचालय, बाथरूमला पाणी नाही, पुरुष कुठंही जातील; पण महिलांचे हाल होतात. शासनाची माणसं येतात, बघून जातात, पण काही सोय करीत नाहीत.

येथील तरुण जगदीश कमळू पारधी याने सांगितले की, सरकारने आम्हाला तीन महिन्यात घरे देऊ असे आश्‍वासन दिले होते, पावसाळ्याच्या आत घरे देणार होते, पण अजून आम्ही कंटेनरमध्ये राहतोय, नोकर्‍या देतो म्हणाले होते, पण नोकर्‍या दिल्या नाहीत, आता आमच्याकडे व्यवसाय काही नाही, आम्हाला सरकारने नोकर्‍या द्याव्यात किंवा आमची वर असलेली शेतजमीन त्यास खाली पर्यायी शेतजमीन द्यावी, अशी आमची मागणी आहे.

येथील दरड ग्रस्त महिला पारधी यांनी सांगितले की, आमची मुलं बिगारी कामावर जातात, राशनवर धान्य देतात, पण ते धान्य घेऊन काय करणार, त्याला मीठ मसाला लागतो, इथं चूल पेटवायला काही आसरा नाही, गॅस वेळेत मिळत नाही, गढूळ पाणी पिऊन आम्हाला आजारपण येत आहे. दिवाळीत घरे देणार होते, दिवाळी गेली पावसाळा आला, पण घरे काही मिळाली नाहीत, सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे.

दरड केवळ गावावर नाही तर आमच्या आयुष्यावर कोसळली असल्याची भावना येथील नागरिक दुःखद अंत करणाने व्यक्त करीत आहेत. आमचा हक्काचा पारंपरिक शेतीचा पर्याय हिरावल्याने ताटातील हक्काची भाकरी मिळेनाशी झाली आहे, तरुणांवर वेठबिगारी करण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या गढूळ पाण्याने आजारपण व रोगराई पसरत असल्याची ओरड सुरु आहे. सरकारने दिलेली आश्‍वासने गढूळ पाण्यातील तुरटीसारखी विरघळली असल्याने दरडग्रस्त नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आमचे पुनर्वसन कधी होणार? आम्हाला हक्काची घर कधी मिळणार?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

इर्शाळवाडीतील दरडग्रस्त नागरिकांचे सुरक्षित जागेत पुनर्वसन करण्यात येत आहे. सिडकोच्या माध्यमातून नवीन जागेत 44 घरांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच येथील रस्ते, नळजोडणी, वीज, शिक्षण, आरोग्य सेवा सुविधा देण्याचे नियोजनदेखील सुरु आहे. जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण करून ही घरे नागरिकांच्या ताब्यात देणार आहोत. शासन नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे.

आयुब तांबोळी, तहसीलदार
Exit mobile version