बोट दुर्घटना: मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अपघाताचं कारण

। उरण । प्रतिनिधी ।

गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जाणार्‍या बोटीला दुपारी तीनच्या सुमारास धडक बसली आणि या दुर्घटनेत 13 जणांना जीव गमवावा लागला. काही दिवसांपूर्वी कुर्ला बेस्ट बस अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता.

निलकमल ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियावरुन 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जात होती. या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. नौदलाच्या स्पीड बोटीला नवं इंजिन लावलं होतं. त्याची चाचणी सुरू होती. त्याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरील नियंत्रण सुटल्याने ही बोट प्रवासी बोटीला धडकल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या अपघातात 10 प्रवाशांचा आणि तीन नौदलाच्या बोटीवरील कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातातील 101 जणांचा वाचवण्यात यश आलं आहे. या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नौदलाकडून त्याचा नकार करण्यात आला.

दरम्यान, नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. बोटीची क्षमता 80 असताना त्यातून 110 जण प्रवास करत होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणार्‍या बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे. अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. या घटनेची नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार आहे.
बोटीवर तब्बल 110 जण असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) अधिकृतपणे देण्यात आली. विविध रुग्णालयामध्ये दाखल असलेले प्रवाशी 110 होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बोटीत असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, नीलकमल बोटीला धडकणार्‍या नौदलाच्या स्पीड बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय नौदलाकडून व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात अधिकृत माहिती नौदलाकडून देण्यात येणार आहे.

कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण
जेएनपीटी हॉस्पिटल- 56
नेव्ही डॉकयार्ड हॉस्पिटल- 32
अश्‍विनी हॉस्पिटल- 1
सेंट जॉर्ज हॉस्पिटल- 9
करंजा हॉस्पिटल- 12

गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा बोटीला झालेल्या अपघातातील जखमींना उपचारासाठी नवी मुंबईतील जेएनपीए रुण्यालयात दाखल केले आहे. त्यातील एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नौदल आणि कोस्टगार्डने तातडीने बचावकार्य केलं आहे. यामध्ये 9 बोटी आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली. आणखी बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे. ‘या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिली जाईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल’ अशी सूचनाही फडणवीस यांनी दिली.

Exit mobile version