मुख्यमंत्र्यांनी घेतले आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच अलिबाग तालुक्यात आले आहेत. ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

ठाण्याहून शासकीय हेलिकॉप्टरने रेवदंडा येथे प्रयाण केल्यानंतर त्यांचे जेएसडब्लू कंपनीचे हेलिपॅड, साळाव येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून मोटारीने रेवदंडाकडे प्रयाण करीत निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी आगमन होताच मुख्यमंत्री शिंदे यांचे धर्माधिकारी परिवाराने जोरदार स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुढे नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी निरुपणकार सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी तसेच त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता.

Exit mobile version