ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत

तुटपुंज्या मोबदल्यावर रात्रीच्यावेळी राबविले जाते
महिला व बालकल्याम विभागाचे दुर्लक्ष

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-मुरूड मार्गावरील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरु असून, ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. मात्र, या कामांसाठी बालकामगारांची मदत घेतली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. असे असतानाही या प्रकाराकडे महिला व बालकल्याण विभागाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.

रेवदंडा-मुरूड मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण आणि मजबुतीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. साळाव ते बोर्ली, मुरूडपासून विहूरपर्यंत ठिकठिकाणी डांबरी रस्ते खोदून ठेवले आहेत. महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळामार्फत करोडो रुपयांचा निधी मंजूर करून या रस्त्याचे काम सुरु केले आहे. पावसाळा सुरु होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. खोदलेले रस्ते, साकव, पुलांच्या अपूर्ण कामांमुळे पर्यटकांसह स्थानिकांना प्रचंड त्रास होत आहे. यंदा पावसाळ्यात चिखलातून प्रवास करण्याची वेळ येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. परराज्यातील कामगार रस्त्याचे काम करीत आहेत. आदित इंफ्रा या कंपनीमार्फत या रस्त्याचे काम चालू असून, हे काम संथ गतीने सुरु असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या रस्त्याचे काम करण्यासाठी परराज्यातून बाल कामगारांना बोलावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 14 ते 15 वर्षाची मुले रात्रीच्या वेळी या ठिकाणी काम करीत असल्याची बाब एका सामाजिक कार्यकर्त्याने उघड केली आहे. तुटपुंज्या मोबदल्यावर या मुलांना रात्रीच्या वेळी कामावर ठेवले जात आहे. त्यामुळे ठेकेदाराबाबत तीव्र संताप निर्माण झाला आहे. रस्त्याचे कामाचा कोणताही अनुभव नसताना त्या मुलांना राबविले जात आहे. त्यामुळे ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या घटनेनंतर महिला व बालकल्याण विभाग काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

प्रोजेक्ट मॅनेजरने बोलणे टाळले
रेवदंडा-मुरूड मार्गावरील रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरु आहे. या रस्त्याच्या कामासाठी बाल कामगारांना रात्रीच्या वेळी राबविले जात आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परराज्यातील 14 ते 15 वर्षाची मुले या ठिकाणी काम करीत आहेत. या प्रकाराबाबत प्रोजेक्ट मॅनेजर ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी यावर बोलणे टाळले. त्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजरच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये त्यांचाच सहभाग असल्याची चर्चा आहे.
Exit mobile version