मुलांना ‘माऊली’कडून अध्यात्मिक ज्ञान; 40 मुलांनी नोंदवला सहभाग
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ-कशेळे राज्यमार्गावरील जिते फाटा येथे माऊली अध्यात्मिक बाल संस्कार शिबीर ज्ञानपीठ केंद्र सुरू करण्यात आले आहे. या बाल आध्यात्मिक शिबिरात कर्जत तसेच आजुबाजूच्या तालुक्यातील 40 मुलांनी सहभाग नोंदवला.
पूर्णपणे निवासी स्वरूपातील बाल संस्कार केंद्र हे 13 वर्ष सुरू आहे. आपल्याला लहान मुलांना शाळेमध्ये पुस्तकी ज्ञान दिले जाते. परंतु, आपल्या मुलांना अध्यात्मिक संस्कार करणे हे खूप गरजेचे आहे. लहान मुलांना लहान वयातच अध्यात्मिक ज्ञान देणे गरजेचे आहे. हे अध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी आळंदी व पंढरपूर येथे आपल्या मुलांना पाठवावे लागत होते. याचीच जाणीव पिंपळोली येथील विजय पाटील यांना झाली. कर्जत तालुक्यातील तसेच परिसरातील मुलांना त्रास होऊ नये, यासाठी अध्यात्मिक बाल संस्कार घडवण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतून माऊली अध्यात्मिक बाल संस्कार शिबीर ज्ञानपीठ केंद्र जिथे फाटा येथे सुरू करण्यात आले.
या बाल संस्कार केंद्रामध्ये मृदुंग वादन, हार्मोनिया, किर्तन, भजन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, तसेच गीता पठण करून मुलांना शिकविले जात आहे. गणेश पाटील हे शिबिराच्या माध्यमातून मुलांना मृदुंग शिकवत आहेत. तसेच, श्रीमद् भगवद्गीता, ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ ज्ञानेश्वरी घाटे या शिकवत आहेत. प्रसाद हे शिक्षक म्हणून मुलांना संस्कार शिकवत आहेत. तर, पवन भोईर यांच्या माध्यमातून भजन शिकवण्याचे काम केले जात आहे.
माझ्या प्रवचन कीर्तन परमार्थाच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांतून बाल संस्कार केंद्र उभारून मुलांना घडवण्याचे काम करत आहे.
विजय पाटील
दरवर्षी आपल्याकडे बालसंस्कार शिबीर होत आहे. प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यभरासाठी विद्यार्थी आहे. आयुष्य असेपर्यंत तो या जीवनात शिक्षण घेत असतो. आपल्या परिसरातील मुलांना आळंदीमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य नाही, अशा मुलांसाठी बाळ संस्कार केंद्र उभारून हे शिक्षण आपल्या येथे दिले जात आहे.
ज्ञानेश्वरी घाटे
अध्यात्मिक ज्ञानपीठ केंद्र जिते, कोल्हार येथे सुरू आहे. तेरा वर्ष झाली हे बाळ संस्कार केंद्र सुरू आहे.किर्तन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अध्यात्मिक गीता शिकवण्याचे काम येथे सुरू आहे. आपला हिंदू धर्म वाढला पाहिजे यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करत आहोत.
गणेश पाटील
