| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ येथे असलेली श्री संत ज्ञानोबा तुकोबा आध्यात्मिक केंद्र यांच्यावतीने आध्यात्मिक बाल संस्कार शिबीर सुरू झाले आहे. कर्जत, मुरबाड, अंबरनाथ, खालापूर आणि पनवेल तालुक्यातील 45 विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला आहे. या संत ज्ञानोबा तुकोबा आध्यात्मिक केंद्राच्यावतीने 20 दिवस बाल संस्कार शिबीर आणि आठ दिवसांचा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे.
नेरळ येथील संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेच्या सलग 16 व्या वर्षी अध्यात्मिक बाल संस्कार शिबीर भरवले आहे. 15 मे ते 1 जून या कालावधीत हे बालसंस्कार शिबीर सुरू असून, या शिबिरात ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील 40 बालकांनी सहभाग घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष कैलास महाराज भोईर यांनी वारकरी संप्रदायामध्ये नवीन पिढी घडवण्याचे कार्य करणार्या श्रीसंत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेमार्फत दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी वारकरी संप्रदाय आणि वादनाचे प्रशिक्षण देण्यासाठी अध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले जाते.
या अध्यात्मिक बालसंस्कार शिबिरामध्ये गीता पठण, पखवाज वादन, वारकरी भजन गायन, हरिपाठ, कीर्तन, योगासन, प्रवचन आणि समाजप्रबोधन वैदिक शिष्टाचार आदींचे शिक्षण दिले जाणार आहे. या शिबिरात देवाची आळंदी येथील श्री गोविंद महाराज शिंदे हे गायनाचे अभ्यासक्रम घेत आहेत, तर देवाची आळंदी येथील माऊली महाराज गोल्ड हे विद्यार्थ्यांना मृदुंगमणीचे शिकवण देत आहेत.