सात महिन्यांपासून होता फरार
। कर्जत । प्रतिनिधी ।
उरण येथील शासकीय जमीन परस्पर विकणे हे शिंदे शिवसेना गटाचे युवा तालुका प्रमुख तथा कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या फसवणूक प्रकरणात अमर मिसाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे. जमीन गैरव्यवहारात 10 जणांवर न्हावा-शेवा पोलिसांनी गुन्हे दखल केले होते, यातील मुख्य सूत्रधार हा अमर मिसाळ असल्याची माहिती मिळत आहे. सात महिन्यांनंतर मिसाळ यांना अटक करण्यात आली.
न्हावा-शेवा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या विंधणे येथील सरकारी जमिनीचे मालक असल्याचे भासवून जमिनीच्या नोंदी सातबारावर करून घेतल्या होत्या. त्यातच शासनाच्या मालकीची ही जमीन संगणमताने शासनाच्या अलिबाग-विरार मल्टी मॉडेल कॉरिडोर प्रकल्पासाठी विकून शासनाचे एक कोटी 36 लाख 63 हजार 700 रुपयांना विकून हा गैव्यवहार केला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी मंडल अधिकारी मनीष जोशी यांच्यामार्फत न्हावा सेवा बंदर पोलीस ठाण्यात फसवणुकी प्रकरणी सप्टेंबर 2024 मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.
सात महिन्यात या प्रकरणी 10 पैकी आरोपी वेणी ब्रायन डिसोजा (बनावट गेलाराम भुरोमल), संकेत पाटील, संतोष मराठे, बोगस गेलाराम भूरोमल, दत्ता कमदुकर, संतोष पांडे यांना टप्प्याटप्प्याने तर नबिजात अन्सारी याला या आधी अटक करण्यात आली होती. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असताना या कटाचे सूत्रधार कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ तसेच राजेश नाविक, अजित भंडारी हे तिघे होते. मात्र, हे तिघे पोलिसांना सापडत नव्हते. हे तिन्ही आरोपी गेले सात महिने मोकाट असल्याने पोलिसांच्या तापासावर संशय व्यक्त केला जात होता. यातील आणखी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. उर्वरित आरोपी अमर मिसाळ यालादेखील आता न्हावा सेवा पोलिसांनी कर्जतमधून ताब्यात घेतले आहे.
या जागेचे नेमके प्रकरण काय?
या जमिनीचे मूळ मालक हे देशाची फाळणी झाली तेव्हा देश सोडून गेले आहेत. त्यामुळे त्यांची जमीन ही सरकारने ताब्यात घेतली. ही जमीन जरी कागदोपत्री शासनाकडे असली तरी प्रत्येक्ष अनधिकृत ताबा भूमाफीयांनी घेतला होता. यासाठी या भूमाफीयांनी 1985 चे बनावट वाटप पत्रक तयार केले होते. त्यानंतर हेच वाटप पत्रक 2020 मध्ये उरण तहसीलदारांसमोर सादर करण्यात आले होते.
त्यामुळे ही जमीन बोगस मालकाकडे हस्तांतरित झाली. गेला राम भुरोमल नावाच्या व्यक्तीला फसवणूक करून हस्तांतरित केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले होते. त्यानंतर बेनी ब्रायन डिसूजा नावाच्या व्यक्तीने गेलाराम भुरोमल या नावाने तहसीलदारांसमोर हजर राहून जमिनीचे अभिलेख हस्तांतरित करून घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे.