रायगड मेडिकल असोसिएशनचा पुढाकार
| कर्जत | प्रतिनिधी |
रायगड मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने कर्जत येथील नसरापूर येथे कर्जत मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यात आला. यावेळी 100 हून अधिक महिलांचे हिमोग्लोबिन आणि साखरेचे प्रमाण यांचीदेखील तपासणी करण्यात आली.
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून रायगड मेडिकल असोसिएशन, लार्सन अँड टुब्रो फाऊंडेशन, कोतवाल वाडी ट्रस्ट व सद्भाव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुळकर्णी, डॉ. प्रशांत गांगल (सचिव), डॉ. कुमार ओसवाल (कोषाध्यक्ष), डॉ. दिलीप सावळे (संपादक), डॉ. संजय भामेरे (वरिष्ठ फिजिशियन, एल अँड टी), तसेच डॉ. शर्वाणी कुळकर्णी (स्त्रीरोगतज्ज्ञ, कर्जत) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या सर्वांनी उपस्थित महिलांना आपल्या आरोग्याची कशाप्रकारे काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. शर्वाणी कुळकर्णी यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळीविषयीच्या गैरसमजुती, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीकरणाविषयी मार्गदर्शन केले.
या शिबिरात 100 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्या सर्व महिलांची हिमोग्लोबिन आणि साखरेची तपासणी तसेच सॅनिटरी नॅपकिन्स आणि औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. लाड (सद्भाव फाऊंडेशन) आणि सुमिता अडे (एल अँड टी मॅट्रन) आणि त्यांच्या कार्यक्षम टीमने शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.